डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं आणि रणनिती पाहता, वॉशिंग्टन अमेरिकेचं लष्कर या आठवड्याच्या शेवटी इराणवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे.
या लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता द्यायची की नाही, याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असं वृत्त CNN नं प्रसिद्ध केलं आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्यानं पश्चिम आशियात अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधनं तैनात करण्यात आलं आहे.
सदर तयारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे.
काही सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खासगी चर्चेत लष्करी कारवाईच्या बाजूने आणि विरोधातही युक्तिवाद केला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या या परिस्थितीवरील तोडगा म्हणून संभाव्य सर्वोत्तम मार्गांबाबतही सल्लागारांची मतं जाणून घेतली. या तणावाचे कमीजास्त परिणाम भारतासह जगातील इतरही राष्ट्रांवर दिसून येत आहेत.
दरम्यान, दोन्ही देशांत जिनिव्हा येथे अणुकार्यक्रमाबद्दल चर्चा झाली असली तरी परस्पर देशांनी प्रत्युत्तराचा इशाराही दिला होता. ज्यामुळं आता पुढं काय होणार, याकडेच संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.