लहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई
तुम्ही जाणून आश्चर्यचकित व्हाल, पण भारतीय रेल्वे विभागानं जवळपास 2800 कोटी रुपयांची जास्तीची रक्कम लहान मुलांच्या तिकीटातील निमयमात झालेल्या बदलातून वसूल केली आहे.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत येणाऱ्या Centre for Railway Information Systems (CRIS) मधून ही माहिती समोर आली आहे. जिथं 2022-23 मध्ये सर्वाधिक 560 कोटी रुपयांचा नफा रेल्वेला झाल्याचं उघड झालं.
31 मार्च 2016 मध्ये लहान मुलांच्या प्रवासाविषयी रेल्वेनं काही नियम जाहीर केले होते. जिथं पाच ते 12 वर्षांदरम्यान मुलांसाठी रेल्वे विभागाकडून तिकीटाची पूर्ण रक्कम आकारण्यात येईल.
21 एप्रिल 2016 पासून हा नियम लागू झाला. तेव्हापासून आतापर्यंत रेल्वे विभागानं तब्बल 2800 कोटी रुपये कमवल्याची बाब समोर आली.
21 एप्रिल 2016 च्या पूर्वी भारतील रेल्वे विभागाकडून 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध्या दरानं तिकीट दिली जात होती.
किंबहुना जर मुलासाठी वेगळं बर्थ न घेता एखाद्या प्रौढासोबत एकाच बर्थवर तो किंवा ती प्रवास करत असेल तरीही त्यांच्या तिकीटासाठी अर्धीच रक्कम आकारली जात होती.
माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लहान मुलांपैकी जवळपास 70 टक्के मुलांसाठी तिकीटाची पूर्ण रक्कम भरण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे.