हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप सारख्या समस्या अनेकांना होतात. तापमान कमी झाल्याने हिवाळ्यात आरोग्याशी निगडित समस्या वाढतात.
हिवाळ्यात घसा खवखवणे, त्यात वेदना होणे या सर्वात सामान्य समस्या आहेत. जिथे प्रदूषण वाढते तिथे लोकांना आणखी समस्या येतात. येथे काही घरगुती उपाय आहेत ज्यांनी आराम मिळू शकतो.
घसा खवखवत असेल, दुखत असेल किंवा घसा जाम झाला असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करा. यामुळे आराम मिळेल तसेच यात दोन ते तीन लवंग सुद्धा टाकू शकतात.
घशातील खवखव कमी करण्यासाठी किंवा बंद झालेल्या घशावर आराम मिळण्यासाठी ज्येष्ठमध सर्वात फायदेशीर ठरतं. तुम्ही दिवसभर ज्येष्ठमध तोंडात ठेऊन ते चावू शकता. यामुळे त्याचा रस तुमच्या घशात जाईल आणि आराम मिळेल.
घशातील खवखव असेल तर त्यापासून आराम मिळण्यासाठी थोडा ओवा आणि तुळशीची पाने घालून एक काढा बनवा. तुम्ही आलं आणि काळी मिरी देखील घालू शकता. याला कोमट पाण्यात मिसळवून प्या.
घशातील खवखव आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काळी मिरी पावडर मधात मिसळून घेऊ शकता यामुळे आराम मिळतो.
तुम्ही गरम पाण्याची वाफ सुद्धा घेऊ शकता. या पाण्यात मीठ, लवंग, तुळशीची पाने टाका यामुळे जास्त फायदा होऊ शकेल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)