काही पदार्थ हे त्यांच्या गुणधर्मांमुळं वर्षानुवर्षांपासन आहारात समाविष्ट केले जात आहेत. मग त्या डाळी असो , भाज्या असो किंवा तूप.
प्रत्येक पदार्थाचा वेगळा गुणधर्म आणि आरोग्यास पुरक ठरण्याची क्षमता यांमुळं प्राधान्यानुसार त्या त्या पदार्थांना आहारात स्थान मिळतं.
असाच एक पदार्थ, त्याच्या इतिहासात डोकावलं असता थेट दहा हजार वर्षे मागं घेऊन जातो.
आयुर्वेदात या डाळीचे कैक औषधी गुणधर्म आढळत असल्यानं या डाळीला औषधी मान्यतासुद्धा आहे.
हा आश्चर्याचा धक्का देणारा पदार्थ म्हणजे कुळिथाची डाळ. इंग्रजीत या डाळीला 'हॉर्स ग्रॅम' असं म्हणतात.
जगातील सर्वात जुन्या डाळींपैकी एक म्हणून कुळिथाची डाळ ओळखली जाते. तिचा इतिहास गंगेचं खोरं आणि वैदिक संस्कृतीहूनही जुना आहे.
असे संदर्भ आढळतात की हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये कुळिथाच्या डाळीचं सेवन केलं जायचं.
महाराष्ट्रात याच कुळिथापासून कोकण पट्ट्यामध्ये पिठी बनवून हा पदार्थ आवडीनं खाल्ला जातो.