पावसाळा सुरु झाला की बऱ्याचदा घरामध्ये माशा भिरभिरू लागतात. या माशा अन्नावर बसल्या तर ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाशी निगडित आजार होऊ शकतात.
तेव्हा घरी भिरभिरणाऱ्या माशांपासून तुम्हाला कायमची सुटका मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतील.
एका लहान डिशमध्ये कापूर घेऊन तो जाळा आणि त्याचा धूर घरभर पसरवा. या धुरामुळे माशा पळून जातात. हा प्रयोग तुम्ही संध्याकाळी किंवा ज्यावेळी माशा जास्त असतील त्यावेळी करू शकता.
घरात लिंबू आणि मीठ या गोष्टी सहज उपलब्ध असतात. एका ग्लासभर पाण्यात दोन चमचे मीठ आणि एक लिंबू पिळून घ्या. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घरभर स्प्रे करा. असं केल्यानं माशा पळून जातील.
ऍपल साईड व्हिनेगर सुद्धा पाण्यात मिक्स करून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घरभर स्प्रे करा. असं केल्यानं माशा पळून जाण्यास मदत होते.
घरात भिरभिरणाऱ्या माशांना पळवून लावण्यासाठी तेजपत्ता उपयोगी ठरू शकतो. तेजपत्ता जाळून त्याचा धूर केल्यास माशा पळून जातात. तसेच तेजपत्याच्या वासाने माशा निघून जातील.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. घरगुती उपाय करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)