बरेच लोक वांग्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. जसे की- वांग्याचे काप, वांग्याची भाजी किंवा वांग्याचे भरीत.
सगळ्यांच्याच घरी वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत बनवलेच जाते. पण आज आपण वांग्याची एक वेगळी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत.
ही रेसिपी बनवायला खूप वेळ लागत नाही आणि चवीलाही लज्जतदार असते.
छोटी वांगी, लसूण, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, मोहरी, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, जीरे आणि कोथिंबीर
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जीरे, बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
नंतर त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, मीठ, चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून टोमॅटो शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवा.
वांग्यांना मधून चीर देऊन त्या फोडणीत घाला आणि 10-15 मिनिटे झाकून मंद आचेवर शिजवा. मधे मधे हलवत राहा जेणेकरून वांगी खाली लागणार नाहीत.
वांगी चांगली शिजल्यानंतर त्यात गरम मसाला घालून आणखी काही वेळ शिजवा. शेवटी वरून कोथिंबीर घालून सजवा.
गरमागरम लसूणी वांगी तुम्ही चपाती, भाकरी, वरणभात किंवा खिचडीसोबत खाऊ शकता.