उन्हाळ्यात रस्त्यावरून चालत असताना तहान लागली की पाय आपोआप रसवंती केंद्रांकडे वळतात.
रसवंती केंद्रातील मशीन मधून येणार 'छुमछुम' असा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. हा आवाज उसाचा रस काढणाऱ्या मशीनला लावलेल्या घुंगरांमधून येत असतो.
पण उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधले जातात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
अनेकजणांना रसवंती केंद्रातील मशीनवर लावलेले घुंगरू आणि त्यांचा आवाज हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असावा असं वाटत असेल पण ते तसं नाहीये.
मशीनला लावलेल्या घुंगरांचा संबंध हा रसवंती गृह चालकांच्या कृतज्ञतेच्या भावनेशी जोडलेला आहे.
पूर्वी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढला जायचा. आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी उसाचा रस काढण्यासाठी लाकडी घाण्याचा वापर केला जातो.
काळानुसार अनेक बदल झाले आणि तंत्रज्ञानामुळे रसवंती केंद्रात बैलांच्या लाकडी घाण्याची जागा लोखंडी मशीन्सने घेतली.
पण एकेकाळी बैलांनी रसवंती केंद्रात केलेल्या श्रमामुळे आपल्या कुटुंबाचं पोट भरलं गेलं ही आठवण रसवंती गृह चालवणाऱ्या शेतकऱ्यांनी ठेवली. त्यामुळे शहरात रसवंती गृह चालवणारी अनेक व्यावसायिक आजही उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू बांधतात.