पिझ्झा हे नाव ऐकलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्याची वेगळी चव आणि आकर्षक टॉपिंग्समुळे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.
मात्र, मैद्यापासून बनवलेल्या पिझ्झामुळे पोट बिघडण्याचा धोका असतो.
पण तुम्ही कधी उरलेल्या पोळ्यांपासून पिझ्झा बनवायची कल्पना केली आहे का? जर नसेल, तर आज आपण जाणून घेणार आहोत की साध्या पोळीचा वापर करून चविष्ट, हेल्दी आणि झटपट पिझ्झा कसा बनवायचा.
उरलेल्या पोळ्या, पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिर्ची, पिझ्झा सॉस, मेयोनिज, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, चीज, तेल / तूप / बटर
सर्वप्रथम पोळी घेऊन त्यावर पिझ्झा सॉस आणि मेयोनिज चांगल्या प्रकारे पसरावा आणि त्यावर थोडं किसलेलं चीज घाला.
आता तुमच्या आवडीनुसार चिरलेली भाज्यांचे टॉपिंग्स (टोमॅटो, कांदा, ढोबळी मिर्ची, पनीर) पोळीवर पसरवा. पुन्हा वरून चीज घाला.
एक नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडं तेल/तूप/बटर घाला. तयार केलेला पोळी-पिझ्झा त्या तव्यावर ठेवा आणि झाकण ठेवून मंद आचेवर चीज वितळेपर्यंत भाजा.
चीज वितळल्यानंतर त्यावरून ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून गरमागरम सर्व्ह करा.
हा पिझ्झा केवळ चविष्टच नाही तर हेल्दी देखील आहे. बाजारात मिळणाऱ्या पिझ्झाच्या तुलनेत हा अधिक आरोग्यदायी आणि घरी सहज तयार होणारा पर्याय आहे.