भारत - पाक यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती होती. पाकिस्तान भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करत होता तर भारत यशस्वीपणे हे हल्ले परतवून लावून त्यांना प्रतिउत्तर सुद्धा देत होता. मात्र 10 मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.
जेव्हा जेव्हा युद्धाचा विषय येतो तेव्हा तेव्हा अणुबॉम्ब सुद्धा चर्चेत येतात. भारत पाक युद्धादरम्यान पाकिस्तानच्या काही नेत्यांकडून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी सुद्धा दिली होती.
भारताकडे अग्नी, शौर्य, प्रलय आणि ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्रे आहेत, जी अणुहल्ला करण्यास सक्षम आहेत. भारताकडे समुद्र, हवा आणि जमीन या तिन्ही ठिकाणांहून अणुहल्ला करण्याची क्षमता आहे, ज्याला न्यूक्लियर ट्रायड म्हणतात.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2024 च्या अंदाजानुसार, जगातील नऊ देशांकडे 12000 हून अधिक अण्वस्त्रे आहेत. यात रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे.
रशियाकडे 2815 आणि अमेरिकेकडे 1928 अणुबॉम्ब आहेत. चीनकडे 410 फ्रान्सकडे 290 ब्रिटनकडे 225 पाकिस्तानकडे 170 आणि भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत. उत्तर कोरियाकडे कमीत कमी 30 अणुबॉम्ब आहेत.
सध्या अणुबॉम्ब किंवा वॉरहेड तयार करण्यासाठी 18 दशलक्ष डॉलर्स (1530 कोटी) ते 53 दशलक्ष डॉलर्स (4516 कोटी) पर्यंत खर्च येतो. अणुबॉम्ब प्रणालीचा एकूण खर्च 4500 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. परंतु, प्रत्येक देशानुसार खर्चाचा आकडा बदलू शकतो.
अमेरिकेतील 'B61-12' अणुबॉम्ब अत्यंत प्राणघातक मानला जातो. त्याची किंमत 28 दशलक्ष डॉलर्स आहे. परंतु, यात क्षेपणास्त्र, प्रक्षेपण विमान, प्रक्षेपण पॅड आणि देखभालीचा खर्च धरल्यास अणुबॉम्बची एकूण किंमत सुमारे 270 दशलक्ष डॉलर्स किवा अंदाजे 2300 कोटी रुपये आहे.