आपण नेहमी पाहतो की ऑफिसमध्ये एसीचं तापमान कमी झालं की सगळ्यांनाच थंडी वाजू लागते. पण महिलांना विशेष थंडी जाणवते.
अशावेळी अनेक महिला गरम कपडे, शॉल्स यांचा वापर करून स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात.
एका संशोधनानुसार ज्या तापमानात पुरुष सहजतेने काम करू शकतात. त्याच तापमानात महिलांना अस्वस्थता जाणवू लागते.
पण यामागे नेमकं कारण काय आहे, हे फार थोड्यांना माहिती आहे. तर जाणून घेऊयात सविस्तर.
महिलांना थंडी जास्त जाणवण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिझमचा स्तर कमी होणे.
महिलांचा मेटाबॉलिझम स्तर पुरुषांपेक्षा तुलनेने कमी असतो. यामुळे त्यांच्या शरीरात उर्जा निर्माण होण्याचा दरही कमी असतो.
परिणामी शरीरातून निर्माण होणारी उष्णता देखील कमी होऊ लागते. म्हणूनच त्यांना जास्त थंडी जाणवते.
संशोधनातून असंही समोर आलं आहे की महिलांना 25 अंश सेल्सियस तापमानात काम करणं अधिक सोयीचं वाटतं. तर पुरुषांना 22 अंश सेल्सियस पर्यंतचं तापमानही अनुकूल वाटतं.