आंबोली घाटात तुफान पाऊस; खळाळता धबधबा पाहण्यासाठी तुम्ही इथं कसे पोहोचाल? पाहा...
महाराष्ट्रात मान्सूननं दमदार बॅटिंग सुरु केलेली असतानाच आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पूरस्थितीसुद्धा निर्माण झाली आहे. काहींनी हीच संधी साधत पावसाळी सहलींचे बेतही आखले आहेत. सहलींसाठी कुठे जायचं हा प्रश्न विचारला असता, एका ठिकाणाला अनेकांचीच पसंती मिळते. ते ठिकाण म्हणजे आंबोली घाट आणि नजीकचा परिसर.
यंदाच्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत म्हणजेच साधारण मागील 45 दिवसांमध्ये आंबोलीत तब्बल 4500 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वर्षभराची आकडेवारी पाहता इथं सरासरी कमाल 11000 मिमी इतक्या पावसाची नोंद होते.
परिणामी 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर असाच राहिल्यास आंबोली घाटात पावसाची विक्रमी नोंद करण्यात येईल. विक्रमी पर्जन्यमानामुळं या भागाचा उल्लेख महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणूनही केला जातो.
वर्षा पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी आता मुंबई- पुण्याहून अनेक पर्यटक येताना दिसत आहेत. कर्नाटक आणि गोव्यातूनही इथं येणाऱ्यांची संख्या कमी नाही.
आंबोली घाट परिसरात येऊन तुम्ही इथं खळाखत्या धबधब्यांचा आनंद घेण्यासोबतच वन्य सौंदर्याचाही आनंद घेऊ शकता. धुक्यात हरवणारी दरी आणि धुकं बाजूला होताच दिसणारं नयनरम्य दृश्य म्हणजे आंबोली घाटाचं सौंदर्य वाढवणाऱ्या काही गोष्टी.
थोडक्यात काय, तर आंबोलीला पर्यटनासाठी येणार असाल तर तुमच्यासाठी हा एक अविस्मरणीय पर्याय ठरणार आहे. मुख्य बस स्थानकापासून धबधबा अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळं तुम्ही एसटीनंही इथं पोहोचू शकता. खासगी वाहनानं इथं आल्यास विविध पॉईंट्सवर थांबून तिथं तुम्ही या ठिकाणाचा आनंद घेऊ शकता.
शिरगावकर पॉईंट, हिरण्यकेशी मंदिर, नांगरता धबधबा, सनसेट पॉईंट, कावळेसाद पॉईंट इथं तुम्ही भेट देऊ शकता. आंबोली घाट परिसराला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहता इथं काही रिसॉर्ट सुविधाही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्ध्यात राहण्याची संधी मिळते. काय मग, कधी येताय आंबोलीला? (सर्व छायाचित्र - Maharashtratourism)