भारत अंडर 19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघादरम्यान दोन कसोटी सामन्यांची यूथ कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतला पहिला सामना 30 सप्टेंबरला सुरु झालाय.
या सामन्यात बिहारच्या वैभव सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 58 चेंडूत शतक ठोकलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.
वैभव सूर्यवंशी अवघ्या 13 वर्षांचा आहे. आपल्या शतकी खेळीत वैभवने 58 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली.
वैभवचं वय 13 वर्ष आणि 188 दिवस इतकं आहे. याआधी बांगलादेशच्या नजमुल शातोच्या नावावर (14 वर्ष 241 दिवस) शतक करण्याचा विक्रम जमा होता.
वैभवने रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये मुंबईविरोधात बिहार संघातून पदार्पण केलं होतं. यावेळी त्याचं वय अवघं 12 वर्ष होतं.
वैभवने दोन रणजी ट्रॉफी सामन्यात 31 धावा केल्या आहेत. यात त्याचा सर्वाधिक स्कोर 19 हा होता.
यूथ कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करत 293 धावा केल्या. याला उत्तर देताना भारतीय संघाने बिनबाद 129 धावा केल्या आहेत.