भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचा चेस वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. नंबर वन खेळाडू मॅग्नस कार्लसनने प्रज्ञानंदचा पराभव केला.
चेस वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार प्रज्ञानंद हा सर्वात लहान बुद्धीबळपटू आहे. प्रज्ञानंद 18 वर्षांचा असून अंतिम फेरीत त्याने कार्लसनला तगडी टक्कर दिली.
प्रज्ञानंदला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण यानंतरही त्याच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. लाखो रुपयांचं बक्षीस त्याला मिळालं आहे.
चेस वर्ल्ड कप विजेत्या मॅग्नस कार्लसनने 90,93,551 रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. कार्लसनने सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली असून जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे.
तर रनरअप प्रज्ञानंदला 66,13,444 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. या स्पर्धेच्या बक्षीसाची एकूण किंमत 1,51,392,240 इतकी होती.
चेस वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानंद आणि कार्लसनमध्ये पहिली फेरी जवळपास चार तास चालला. 70 हून अधिक चाली खेळल्या गेल्या. यानंतर पहिली फेरी अनिर्णित राहिली.
प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातील दुसरी फेरी देखील अनिर्णित राहिली. दोघांनी सहमतीने हा निर्णय घेतला.
2 फेऱ्या अनिर्णित झाल्यानंतर अखेर टायब्रेकमध्ये जेतेपदाचा निकाल लागला. कार्लसनने टाय्रब्रेकरमधली पहिली फेरी जिंकत विजेतेपद पटकावलं.
प्रज्ञानंदला पराभव पत्करावा लागला असला तरी त्याने कार्लसनला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्याच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.