टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवार 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यापूर्वी त्याने टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती जाहीर केली होती.
भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खळणाऱ्या क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर बीसीसीआयकडून दर महिन्याला पेन्शन दिली जाते. तेव्हा रोहित शर्माला किती पेन्शन मिळणार याबाबत जाणून घेऊयात.
बीसीसीआयच्या नियमांनुसार 25 किंवा त्याहून जास्त टेस्ट सामने खेळणाऱ्या खेळाडूंना पेन्शन म्हणून दरमहा 70 हजार रुपये दिले जातात.
रोहित शर्मा हा भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार सुद्धा होता यासह त्याने टेस्ट करिअरमध्ये एकूण 67 सामने खेळले. त्यामुळे रोहित शर्माला सुद्धा 70 हजार रुपये एवढी पेन्शन मिळेल.
रोहित शर्मा हा टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अजूनही भारताकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार आहे, त्यामुळे रोहितला बीसीसीआयकडून लगेचच पेन्शन सुरु होणार नाही. तो तीनही फॉरमॅटमधून निवृत्त झाला की त्याला पेन्शन सुरु होईल.
रोहित शर्माने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत.
2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.