चीनच्या हांगजू शहरात 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान एशियन गेम्स खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला एक महिन्याचा कालावधी राहिला असतानाच भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट दुखापतग्रस्त झाली आहे. दुखापतीमुळे विनेश फोगात एशियन गेम्समधून बाहेर पडली आहे. याची माहिती तीने स्वत: दिली आहे.
एशियन गेम्समध्ये विनेश फोगाटला डायरेक्ट एन्ट्री मिळाली होती. विनेश आणि बजरंग पुनिया यांना एशियन गेम्सच्या ट्रायलसाटी सूट देण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.
13 ऑगस्ट 2023 रोजी सराव करताना उजव्या पायाल दुखापत झाल्याचं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. स्कॅननंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला आहे.
सतरा ऑगस्टला विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचं आपलं स्वप्न दुखापतीमुळे अपूर्ण राहाणार असल्याचंही तीने म्हटलं आहे.
2018 ला जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये विनेश फोगाटने सुवर्ण पदक जिंकलं होतं. आता त्यामुळे यंदाही विनेशकडून भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठ्या अपेक्षा होत्या.
विनेश ऐवजी आता राखीव खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात येईल. ट्रायल्समध्ये विजय मिळणाऱ्या अंतिम पंघालला संधी देण्यात येईल.