इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी मिनी लिलाव मंगळवारी दुबईतील कोका कोला एरिना येथे झाला. या लिलावात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला खरेदीदार मिळाला आहे.

आयपीएल 2021 मध्ये 32 विकेट्स घेऊन सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या हर्षल पटेलचा पंजाब किंग्जने त्यांच्या संघात समावेश केला आहे.

पंजाब किंग्जने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. लिलावापूर्वी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला करारमुक्त केले होते. गेल्या मोसमात आरसीबीने त्याला 10.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते

हर्षल याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो भारतीय संघाकडून टी-20 सामनेही खेळला आहे.

हर्षल पटेल हा टी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ज्याप्रकारे तो सावकाश चेंडू टाकतो त्यामुळे सर्वोत्तम फलंदाजांनाही त्याच्यासमोर वाचणे कठीण होते.

हर्षलने 2021 च्या आयपीएलमध्ये 32 विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. यादरम्यान त्याने आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

आयपीएलमधील हर्षल पटेलच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 91 सामन्यांच्या 89 डावांमध्ये 111 यश मिळवले आहे. या काळात हर्षलची सरासरी 24.07 आणि इकॉनॉमी 8.59 होती.

2022 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात हर्षलचा समावेश करण्यात आला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय खेळीमध्ये त्याने 25 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story