भारताचा स्टार क्रिकेट विराट कोहली याने १२ मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
टी २० क्रिकेटमधून तो यापूर्वीच निवृत्त झाला होता. आता टेस्ट क्रिकेटमधून सुद्धा त्याने वयाच्या ३६ व्या वर्षी निवृत्ती घेतली. मात्र असं असलं तरी तो वनडे क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर जगभरातील दिग्गज क्रिकेटर्सनी प्रतिक्रिया दिल्या. तर विराटाचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सुद्धा आपल्या शिष्याच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.
राजकुमार शर्मा म्हणाले की, 'भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी दिलेल्या प्रचंड योगदानाबद्दल मी त्यांना सॅल्यूट करतो. प्रशिक्षक म्हणून त्याने देशासाठी जे काही केले आहे आणि तरुणांसाठी त्याने जे उदाहरण ठेवले आहे त्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे'.
ते पुढे म्हणाले, 'भावनिकदृष्ट्या हे दुःखद आहे की आपण त्याला पुन्हा देशासाठी पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळताना पाहू शकणार नाही. मी त्याच्या निर्णयाचे कौतुक करतो आणि त्याचे समर्थन करतो. आशा आहे की, तो भारतासाठी वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तो तिथे असेल आणि तो त्यासाठी १०० टक्के वचनबद्ध असेल'.
विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत.