मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार, 10 तासांचा प्रवास 7 तासांत

Mumbai- Kolhapur Vande Bharat Express Updates: कोल्हापूर ते मुंबई अशी लवकरच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.  15 दिवसांत ही ट्रेन रूळावर येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 12, 2025, 12:03 PM IST
मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार,  10 तासांचा प्रवास 7 तासांत
Good News Mumbai kolhapur Vande Bharat likely to start in 15 days

Mumbai- Kolhapur Vande Bharat Train Updates: मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्स्प्रेस धावते. 

छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत नवी वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या पंधरा दिवसात मुंबईपर्यंत वंदे भारत रेल्वे धावणार आहे. यापूर्वी कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत धावत होती. तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत रेल्वेला आठ डबे असणार असून ती 550 प्रवाशांना वाहून नेईल. ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या रेल्वेमुळं कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. 

दरम्यान, मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान  दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त 7 तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरांतील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. मुंबईतून लाखो भाविक कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जातात. अनेकादा जादा रेल्वे नसल्याने तिकीट मिळण्यास मारामार होते. त्यामुळं या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळं या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यता येत होती. आता मात्र लवकरच या मार्गावर ट्रेन सुरू होणार आहे. 

महाराष्ट्रात 11 वंदे भारत

महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यात मुंबई - सोलापूर, मुंबई- शिर्डी, मुंबई - जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर. नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या मार्गांचा समावेश आहे. आगामी काळात या गाड्यांचा आकडा आणखी वाढणार आहे.