महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी: मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच आहे हे सुंदर ठिकाण; कसं जाल? कुठे राहाल?

Maharashtra Tourism Tourist Places In Winter: तुम्ही एखाद्या विकेण्डला हटके ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर मुंबई आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राज्यातील एकमेव इटालियन शहराला भेट देऊ शकता. हे ठिकाण आहे कुठे? तिथे कसं जायचं? जाणून घ्या A to Z प्लॅन

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 10, 2026, 03:03 PM IST
महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी: मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच आहे हे सुंदर ठिकाण; कसं जाल? कुठे राहाल?
जाणून घ्या या ठिकाणीची ए टू झेड माहिती

Maharashtra Tourism Tourist Places In Winter: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली विवाहबंधनात अडकले तो देश म्हणजे इटली! कायम पर्यटकांची गर्दी असलेला हा देश जगभरातील पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र इटलीचा दौरा करणं हे सर्वसामान्य भारतीयांसाठी खर्चिक ठरु शकतं. पण इटलीमधील व्हाइब्स देणारं एक छानसं ठिकाण मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असून जानेवारी महिनाच या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. या ठिकाणाला, 'महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी' म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी नेमकं जायचं कसं? तिथे विकेण्ड ट्रीप कशी प्लॅन करता येईल याबद्दल जाणून घेऊयात...

Add Zee News as a Preferred Source

कोणतं आहे हे ठिकाण?

मगासपासून आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलतोय त्याबद्दल तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचलं असेल किंवा पाहिलं असेल. या ठिकाणाचं नाव आहे, लवासा!

होय, लवासालाच 'महाराष्ट्रातील इटालियन स्टाइल हिल सिटी' म्हणून ओळखलं जातं. लवासा हे मुंबई तसेच पुण्यापासून जवळच्या अंतरावर एखादं छान ठिकाण शोधत असाल तर परफेक्ट वीकेंड गेटवे ठरु शकतं. 

वारसगाव तलावाभोवती बांधलेलं हे नियोजित शहर रंगीत इमारती, निसर्गाची उधळणं याचा सुरेख संगम आहे. हिवाळ्यामध्ये म्हणजेच साधारण ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचा काळ हा या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ आहे. त्यातही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येथील हवामान छान थंड आणि अल्हाददायक असतं. येथील हवामान फार स्वच्छ असल्याने आपण परदेश दौऱ्यावर तर नाहीत ना असं काही क्षण वाटून जातं.

कसं जायचं?

पुण्याहून लवासा अवघ्या 65 किलोमीटरवर आहे. पुण्याहून इथे पोहचण्यासाठी एक ते दोन तासांचा कालावधी लागतो. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरुन चंदणी चौकातून पुढे पिरंगुट मार्गे लवासाला पोहोचता येतं. या ठिकाणी येण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे स्वत:ची खासगी कार किंवा टॅक्सी.

मुंबईहून लवासा 180 ते 200 किमीमीटरवर असून हे अंतर कापण्यासाठी चार ते पाच तास लगतात. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्गे लोणावळा  आणि तिथून पुढे पिरंगुटवरुन लवासा गाठता येतं.

राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या बसने यायाचं असेल तर हा पर्याय फक्त पुण्यावरुन उपलब्ध आहे. पुण्यातून खासगी बसही लवासापर्यंत येतात. मात्र मुंबईतून येताना स्वत:ची कार किंवा टॅक्सी किंवा सेल्फ ड्राइव्ह कार अधिक फायद्याची ठरते.

लवासामध्ये अनेक ठिकाणी मोफत प्रवेश आहे. पण काही अॅक्टिव्हिटींसाठी परवानगी किंवा अगाऊ बुकिंग लागते.

आता लवासाचा दोन ते तीन दिवसांचा दिवसांची वीकेंड ट्रिप प्लॅन करायची असेल तर ती कशी करता येईल हे पुढे पाहुयात:

पहिला दिवस:

लवासामध्ये दाखल व्हा. चेक-इन नंतर तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात भटकंतीसाठी जाता येईल. या ठिकाणी कॉफी, स्ट्रीट फूड आणि लेक व्ह्यू एन्जॉय करता येतो. संध्याकाळी बोटिंग (पॅडल बोट, बंपर बोट) किंवा जेट स्कीसारख्या माध्यमातून उपलब्ध असून याचाही आनंद घेता येईल. जिथे स्टे केला आहे त्याच हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण करता येईल.

दुसरा दिवस:

अॅक्टिव्हिटी, नेचर ट्रेल किंवा ट्रेकिंगसारख्या गोष्टी सकाळच्या सत्रात करता येतील. नंतर वॉटर स्पोर्ट्समध्ये कयाकिंग, झिप लायनिंग किंवा अॅडव्हेंचर पार्कचा आनंद घेता येईल. दुपारी वारसगाव धरण आणि व्ह्यूपॉइंट्सला भेट देता येईल. संध्याकाळी ज्या ठिकाणी थांबला आहात तिथे छान शेकोटीचा आनंद घ्या. हल्ली अशी शेकोटी हिवाळ्याच्या कालावधीमध्ये पॅकेजमध्येच देतात.

तिसरा दिवस:

पुन्हा घरी परतण्यासाठी सकाळी 11 पर्यंत चेक-आऊट करता येईल. सकाळी ब्रेकफास्ट नंतर चेक-आऊट करुन परतीच्या वाटेला लागा. येता येता येथून जवळ असलेल्या टेमघर धरणाला भेट देता येईल.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More