पवारांच्या अडचणी वाढल्या! पार्थ पवारांच्या कंपनीपाठोपाठ 'जिजाई' बंगलाही वादात; टॅक्सचा झोल?

Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे जमिनीच्या व्यवहारामुळे वादात सापडलेले असतानाच कंपनीबरोबरच पार्थ यांचं निवासस्थानही चर्चेत आहे

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2025, 12:21 PM IST
पवारांच्या अडचणी वाढल्या! पार्थ पवारांच्या कंपनीपाठोपाठ 'जिजाई' बंगलाही वादात; टॅक्सचा झोल?
अजित पवारांच्या मालकीचा बंगला चर्चेत

Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 'झी 24 तास'ने विशेष तपासामध्ये हे प्रकरण समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनेक अधिकाऱ्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे कंपनीमधील भागिदार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच सदर 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे. असाच एक आक्षेप आता वादात सापडलेल्या अमेडिया कंपनीच्या नोंदणी केलेल्या पत्त्यावरुन घेतला जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

प्रकरणात बंगला आला कुठून?

पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची 40 एकर जमीन गैरव्यवहाराच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांना खरेदी केली. या व्यवहारासाठी 21 कोटींच्या मुद्रांकन शुल्काऐवजी केवळ 500 रुपये भरण्यात आले. या कंपनीची नोंदणी जिजाऊ बंगल्याच्या पत्त्यावर झाली असून अमेडिया होल्डिंग कंपनीचा पत्ता सर्व्हे नंबर 132, बी 21 यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर पुणे - 411005 असा आहे. हा  पत्ता जिजाई बंगल्याचा आहे. त्यामुळेच आता पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

जिजाई बंगल्याच्या करावरुन वाद

मुंढव्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या  अमिडीया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा आहे. मात्र हा बंगला निवासी भागात आहे. त्यामुळे या बंगल्यात कंपनीचे कार्यालय कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पार्थ पवार यांनी अमिडीया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केले असल्यास त्यांनी महापालिकेला मिळकत कर व्यावसायिक दराने भरला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे. जिजाई  बंगला निवासी असल्याने त्याचा मिळकत कर निवासी दराने भरला जात असल्याची माहिती आहे.  मात्र या बंगल्यात कंपनीचे कार्यालय दाखवले गेले असल्याने त्यासाठी महापालिकेला नियमानुसार व्यवसायिक दराने मिळकत  कर भरणे आवश्यक आहे. वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणानंतर पार्थ पवारांच्या कंपनीचा पत्त्यावरूनही आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> ₹500 च्या नोंदणीवरुन 300 कोटींची जमीन खरेदी करणारे पार्थ पवार किती श्रीमंत? जिजाई बंगला अन्...; संपत्तीचा तपशील समोर

बंगल्यासंदर्भातील प्रश्नावरुन चिडले अजित पवार

"कंपनीचा जो पत्ता आहे तो आपल्या घरचा पत्ता असल्याचं कळतंय सर," असं म्हणत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. इतक्यात दुसऱ्याने, '21 कोटी रुपये...' असं म्हणत पुढचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवारांनी पहिल्याच प्रश्नावर उत्तर देताना पत्रकाराला, "अरे बाबा, ऐक ना! तुलाच फार कळतं का? मी स्वत:हून आलो ना?" असा सवाल संतापून विचारला. "कानावर आल्यावर मी एवढच सांगितलं की, कुठल्याही चुकीच्या गोष्टी करु नका. एवढं तर मी सांगणार ना?" असा सवाल अजित पवारांनी विचारला.  "त्या पद्धतीने मी सांगितलं आहे. पण आता तुम्ही जे काही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काही म्हणताय. त्याची शहानिशा करतो ना," असंही अजित पवार म्हणाले.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More