शेतकऱ्यांना सगळं फुकट हवं का? विचारण्यावरुन अजित पवारांना काकांच्या पक्षाचा सवाल; 'पार्थ पवारांच्या अमेडिया..'

Pune Koregaon Park Land Deal: शरद पवारांच्या पक्षाने थेट उपमुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील विधानाचा संदर्भ देत पार्थ पवारांच्या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहारावरुन भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2025, 11:49 AM IST
शेतकऱ्यांना सगळं फुकट हवं का? विचारण्यावरुन अजित पवारांना काकांच्या पक्षाचा सवाल; 'पार्थ पवारांच्या अमेडिया..'
अजित पवारांवर साधला निशाणा (फाइल फोटो)

Pune Koregaon Park Land Deal: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या एका जमीन व्यवहाराने अडचणीत आलेत. 300 कोटी रुपयांच्या ज्या जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीच्या माध्यमातून झाला त्यासाठी 21 कोटींऐवजी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. अनेक नियम आणि कायद्यांना बगल देऊन सरकारी मालकीची ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जमिनीच्या मूळ मालकांनी केलेला असतानाच आता अजित पवारांचे चुलते आणि पार्थ पवारांचे आजोबा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने थेट शेतकऱ्यांसंदर्भात अजित पवारांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना वेगळे नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे आहेत का असा सवाल करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

फुकटचं कोण घेतंय नक्की?

"अजितदादा शेतकऱ्यांना सल्ला देतात की, “सारखं सारखं कर्जमाफी काय मागता? सगळं फुकट हवं का?” पण प्रश्न असा आहे की फुकटचं कोण घेतंय नक्की दादा?" असा सवाल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव विकास लवांडेंनी उपस्थित केला आहे. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचं भांडवल केवळ एक लाख रुपये, पण त्या कंपनीने घेतली 1800 कोटी बाजारमूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटींना! पुण्यातील मु़ंढवा भागात 300 कोटींच्या जमिनीची खरेदीखत नोंद झाली. या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरायची होती, पण ती माफच करण्यात आली!" असा उल्लेख या पोस्टमध्ये आहे. 

सत्ताधाऱ्यांच्या कोट्यवधींच्या व्यवहाराला सवलत कशी मिळते?

"म्हणजे, 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये!  का? कारण खरेदी करणारे ‘अजितदादांचे सुपुत्र’ होते म्हणून?" असा खोचक सवाल शरद पवारांच्या पक्षाच्या सचिवांनी विचारला आहे. "सामान्य माणूस छोट्यातलं छोटं घर घेतानाही लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरतो, पण सत्ताधाऱ्यांच्या कोट्यवधींच्या व्यवहाराला सवलत कशी मिळते?" असा सवाल उपस्थित करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

"शेतकऱ्यांसाठी नियम वेगळे आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे आहेत का? आणि पुण्यातील कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रऊ भागात एवढी जमीन कवडीमोल भावाने मिळतेच कशी हा ही प्रश्न आहे?" असंही पोस्टच्या शेवटी विचारण्यात आलं आहे.

सर्व 22 फाइल्सची पुन्हा तपासणी

दरम्यान, या प्रकरणाशीसंबंधित सर्व 22 फाइल्सची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून यामुळे पार्थ पवारांबरोेबरच त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More