पुण्यात मुसळधार पाऊस; पवना धरण ‘ओव्हर फ्लो’

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यांना पाणीपुरवठा करते. 

Updated: Aug 30, 2020, 12:33 PM IST
पुण्यात मुसळधार पाऊस; पवना धरण ‘ओव्हर फ्लो’ title=

पिंपरी-चिंचवड: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पवना धरण ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पवना धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत. यामधून सध्या तब्बल २२०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर  पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात मगाील २४ तासात ८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मुसळधार पावसामुळे विदर्भात पुराचे संकट; पुण्यातून NDRFची चार पथके नागपूरला रवाना

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यांना पाणीपुरवठा करते. आता धरण भरल्याने या भागातील गावांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. याशिवाय, पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणही यापूर्वीच जवळपास भरले होते. जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री ९४१६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि एकूणच राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. यामध्ये कोयना, तोतलडोह, पेंच, हतनूर, गोसीखुर्द या धरणांचा समावेश आहे. तर औरंगाबादमधील जायकवाडी धरणही ८५ टक्के भरले आहे. जायकवाडी धरणात गोदावरी नदीतून पाण्याची आवक सुरुच आहे. ही पाणी आवक कायम राहिल्यास जायकवाडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे.

आंबेगावातील डिंभे धरण ओव्हर फ्लो
उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेले डिंभे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या घोड नदीत ४२०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.