)
Pune Metro Corruption: खासदार संजय राऊत यांनी मराठवड्यातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करण्याची मागणी पुन्हा एकदा केली असून याच मुद्द्यावरुन सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबरोबरच पुणे जिल्ह्यातील विषयांचा संदर्भ देत काही हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
शेतकरी मदतीसंदर्भात बोलताना राऊत यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतील तेव्हा शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करतील असं म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'कंजूस' माणूस म्हटलं आहे.
"फडणवीस फार कंजूस माणूस आहे. शेतकऱ्यांना मदत कशाप्रकारे द्यायला हवी आहे. शेतकरी प्रश्नावर कानावर बोळा घातला आहे. गौतम अदानी यांना मुंबई विकत आहेत. ते कमिशनवरील मुख्यमंत्री आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, "शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिल्लीतून जाहीर करायला हवे होते. पंतप्रधान आल्यावर पूरस्थितीबाबत मदत जाहीर करतील," असंही राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन झालेल्या टीकेसंदर्भात बोलताना, "उद्धव ठाकरेंचं भाषण सुपर होतं. शिंदे याचा दसरा मेळावा नव्हता. दसरा मेळावा हा फक्त उद्धव ठाकरे याचाच आहे. हे बोगस लोक आहेत. भंपक आहेत. भाजपवर विश्वास ठेवून नये. भाजप म्हणजे टोळी आहे, पक्ष नाही," असा टोला लगावला. "आम्ही मराठी माणसासाठी एकत्रित येत आहोत. जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हा खुळचट, बुळचट मुख्यमंत्री आहे," असंही राऊत म्हणाले.
पुण्याचाच संदर्भ देत राऊतांनी पुणे मेट्रो प्रकल्पात तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. "पुणे मेट्रोमध्ये 12 हजार कोटी रुपये खाल्ले आहेत. भाजपा आणि दोन शिंदे गटाचे लोक आहेत. पुणे प्रशासन तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले आहे," असं राऊत म्हणाले. याचबरोबर प्रशासकीय कामंही सोयीप्रमाणे वाटून देण्यात आल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.
"पुणे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नेमले आहेत. ते टोळी प्रमुखांसाठी काम करत आहेत. पुणे पोलिस आयुक्त भाजपचे कार्यकर्ते आहेत," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.