Lok Sabha Election Results 2024 Live: प्रतिष्ठेचा विषय बनवलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे 1 लाख 54 हजार मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या गटातील शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे. ही निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. कसा जिंकून येतो असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं. अमोल कोल्हेंनी या विजयानंतरच विजयाचं श्रेय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरुर मतदारसंघामध्ये अटीतटीची लढाई होईल अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. या मतदारसंघामधून अजित पवार गटाकडून लढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षांतरही केलं होतं. यापूर्वीही या मतदारसंघामधून मागील निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता. पुन्हा एकदा त्यांनी तोच करिष्मा करुन दाखवला आहे. या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी स्वत: अजित पवार यांनी रोड शो घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ज्या उमेदवारांसाठी सभा घेतली होती त्यामध्ये आढळराव पाटील यांचाही समावेश होता. आढळराव पाटील यांनी आपण आधीच्या निवडणुकीमधील वचपा काढणार असं म्हणत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं. 20 व्या फेरीमध्ये शिरुरमधुन अमोल कोल्हे 1,04,875 मतांनी आघाडीवर होते. 20 व्या फेरीत अमोल कोल्हेंना 5,50,734 मतं होती तर आढळराव पाटलांना 4,45,859 मतं होती. हीच आघाडी अजून 50 हजारांनी वाढवून निवडणूक जिंकली.


विजयानंतर हा विजय अजित पवारांविरोधातील आहे की आढळराव पाटलांविरोधातील या प्रश्नावर अमोल कोल्हेंनी हा विजय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. स्वत: शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंसाठी सभा घेतली होती. या मतदारसंघामधून अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती.


महाराष्ट्रामधील सर्व मतदारसंघांचे निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.