'उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून चालणाऱ्या कंपनीमधून गैरव्यवहार होतात हा...': सुप्रिया सुळे 'त्या' प्रश्नावर काय बोलल्या?

Zee 24 Tass Exclusive To The Point: सुप्रिया सुळेंना ज्या कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार झाला ती अजित पवारांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर नोंदणी केलेली आहे असा सवाल विचारण्यात आला. तसेच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार का असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया काय म्हणाल्या जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 9, 2026, 02:35 PM IST
'उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून चालणाऱ्या कंपनीमधून गैरव्यवहार होतात हा...': सुप्रिया सुळे 'त्या' प्रश्नावर काय बोलल्या?
विशेष मुलाखतीत केलं भाष्य

Zee 24 Tass Exclusive To The Point: पुण्यातील सर्वात उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क वस्तीमधील 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट वीथ कमलेश सुतार' (To The Point With Kamlesh Sutar) या विशेष कार्यक्रमात भाष्य केलं आहे. या प्रकरणामध्ये 300 कोटी रुपयांना ज्या 'अमेडिया' कंपनीच्या माध्यमातून व्यवहार झाला ती कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची आहे. या कंपनीच नोंदणी अजित पवारांचं वास्तव्य असलेल्या जिजाई बंगल्याच्या पत्त्यावर आहे. यासंदर्भातच सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात...

Add Zee News as a Preferred Source

उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून एक कंपनी...

'झी 24 तास'चे संपादक कमेलश सुतार यांनी पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंना, "त्या कंपनीचा पत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री राहतात तिथे म्हणजेच अजित पवारांच्या 'जिजाई' बंगल्याचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो माझ्या मुलाचा आहे. इथे आपण अजित पवार व्यक्ती म्हणून वजा करूयात. पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरातून एक कंपनी चालते. त्यातून असे गैरव्यवहार होतात. विरोधी पक्षाला हा मुद्दाच वाटत नाही?" असा सवाल केला. 

प्रशासन काय करत आहे?

या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "हा विरोधी पक्षाचा विषयच नाही. माझं म्हणणं आहे की प्रशासन काय करत आहे? प्रशासनाने काय खरं काय खोटं हे सांगितलं पाहिजे ना? कंपनी अफेअर्सचा विभाग आहे ना. आयपॅकवर तुम्ही छापा टाकला. तुम्ही सत्तेत असलेल्या मंत्र्‍याच्या घरी कॅश सापडते कोणी काही बोलतही नाही. माझं म्हणणं आहे की कंपनी सेक्रेट्रीची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर ते सांगितलं पाहिजे. विभागाने जी काही कागदपत्रं केली त्यांनी सांगितलं पाहिजे ना काय खरं की काय खोटं," असं मत नोंदवलं.

99 टक्के भागिदार असलेल्यावर गुन्हा नाही पण...

यावरुन कमलेश सुतार यांनी, "पण चौकशीसाठी गुन्हा तर दाखल झाला पाहिजे? कंपनीतील 99 टक्के भागिदार असलेल्यावर गुन्हा दाखल होत नाही. तुमच्याच नात्यातील असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही. तुम्ही म्हणता सरकारने रिपोर्ट द्या. पण सरकारच संरक्षण करत असेल अशी भूमिका आहे ना?" असा सवाल विचारला. यावर सुप्रिया सुळेंनी, "हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे," असं उत्तर दिलं. 

हा मुद्दा लावून धरणार का?

"विरोधी पक्ष म्हणून तुम्ही हा मुद्दा लावून धरणार का? गुन्हा दाखल करा हा मुद्दा तुमचा पक्ष लावून धरणार का?" असा सवाल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळेंनी, "30 दिवसात अहवाल येणार होता. तो आल्यानंतर आमच्या पक्षाकडून भूमिका मांडली जाईल. तो समोर आल्यावर काय झालं आणि काय नाही हे समजेल ना. मी त्याच रिपोर्टची वाट पाहतेय," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "माझ्या मनात वारंवार प्रश्न येतो की महाराष्ट्र सरकारने एवढ्या परवानग्या दिल्या कशा? हा मोठा प्रश्न आहे. विभाग काय करतोय? मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे," असंही त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला कोण नाही म्हणणार?

"मात्र अशावेळी, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला कोण नाही म्हणणार? ते पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे," अशी भूमिका असल्याचं कमलेश सुतार म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळेंनी, "नाही असं नाही होतं. युपीएच्या काळात सगळीकडे आमचं सरकार होतं. पण ए राजा यांनी राजीनामा दिलाच होता ना?" अशी आठवण करुन दिली. त्यावर कमलेश सुतार यांनी, "राजीनामा दिला म्हणून चौकशी झाली इथे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होऊन सुद्धा ते राजीनामा देत नाहीत," असं म्हटलं. सुप्रिया यांनी, "आमच्याकडे जेपीसी झाली. आमचं सरकार होतं तेव्हा जेपीसी झालं. महाराष्ट्र सरकारने परदर्शकपणे जनतेला सांगावं काय आहे ते," असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होईल अशी मागणी कराल का?

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होईल अशी मागणी कराल का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी, "हा देश सर्वांसाठी पारदर्शकपणे चालला पाहिजे. पार्थ असो किंवा विजय आणि रेवतीबद्दल हेच म्हणेल. पण हा देश पारदर्शकपणे चालतो का असा प्रश्न पडतो. याचीच चिंता वाटते. पार्थ मला मुलासारखा आहे. ज्या चौकटीत तुम्हाला नियम आणि तोच आम्हाला आहे. भाजपाने एक नवा ट्रेण्ड त्यांच्या लोकांसाठी काढला आहे त्याला मी वॉशिंग मशिन म्हणते," असं उत्तर दिलं. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More