मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल लवकरच..

मध्य रेल्वेवरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये..

Updated: Jan 10, 2020, 12:02 AM IST

मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावणार आहे. ही लोकल ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल मार्गावर धावणार आहे. मध्य रेल्वेवरील पुलांच्या उंचीमुळे  पहिली एसी लोकल 2017 मध्ये पश्चिम रेल्वेला देण्यात आली. त्यानंतर एसी लोकलच्या उंचीवर तोडगा काढल्यानंतर कुर्ला कारशेडमध्ये 7 डिसेंबर 2019 रोजी पहिली एसी लोकल दाखल झाली आहे. 

या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करुन त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याकरिता तारीख निश्चित करण्यासाठी रेल्वे बोर्डा कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

येत्या आठवड्यात शेवटची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसात मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल प्रवाशा करीता सुरू केली जाईल असे संजीव मित्तल यांनी स्पष्ट केले आहे. 

एसी लोकलची क्षमता ताशी किमान 110 किमी वेगाने धावू शकते. त्यात, आसनांची संख्या 1028 असून उभ्याने 5936 इतके जण प्रवास करू शकतात. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होतात. त्याचे  नियंत्रण मोटरमन आणि गार्डकडे आहेत. डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही पुरविली आहे. 

स्वयंचलित पद्धतीचे दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा आहे. आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास तात्काळ मदतीसाठी मध्य रेल्वेने 100 कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलेले आहे.  

ही लोकल मेक इन इंडिया अंतंर्गत बांधली असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल) ने त्यासाठी विद्युत यंत्रणा पुरविली आहे. चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात ही लोकल तयार केली आहे.