)
Court Case: सतत टॉयलेटला जातो म्हणून एखाद्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं असं तुम्हाला सांगितलं तर, 'काय पकवतोय' असं काहीतरी म्हणून समोरच्याचं म्हणणं उडवून लावेल. मात्र असा एक विचित्र प्रकार खरोखरच घडला असून तो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
हा सारा प्रकार पूर्व चीनमध्ये घडला आहे. येथील एका कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याला मूळव्याधीचा त्रास होत असल्याचा त्याचा दावा होता. त्यामुळेच हा कर्मचारी कामाच्या वेळात वारंवार टॉयलेटला जायचा. त्याचे टॉयलेटचे ब्रेक हे नियमित ब्रेकपेक्षा अधिक काळ असायचे. तो बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून असायचा. त्यामुळेच त्याला कंपनीने नोकरीवरुन काढून टाकलं आहे. कंपनीच्या दाव्यानुसार अनेकदा तो काही तास टॉयलेटमध्ये बसून असायचा.
ज्या कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे त्याचं नाव, ली असं आहे. ली हा जिआंग्सू प्रांतातील एका कंपनीत कामाला होता, असं 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने म्हटलं आहे. एप्रिल ते मे 2024 दरम्यान एकाच महिन्यात या कर्मचाऱ्याने एकूण 14 वेळा काही तासांचे बाथरूम ब्रेक घेतल्याचे नोंदींवरून समोर आलं. त्यानंतर कंपनीने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. या कर्मचाऱ्याचा सर्वात मोठा ब्रेक चार तासांचा होता असे सांगण्यात आलं. मात्र अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याने लीने आपल्याला नोकरीवर रुजू करुन घेताना कंपनीने केलेला करार बेकायदेशीरपणे संपुष्टात आणल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला. कंपनीविरुद्ध ली याने न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर हे प्रकरण जगासमोर समोर आले.
ली हा 2010 मध्ये कंपनीत रुजू झाला होता. 2014 मध्ये त्याने अनिश्चित कालावधीसाठी कंपनीसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले. त्याने केलेल्या दाव्यानुसार, त्याने कंपनीसाठी कायम उपलब्ध राहणे आणि कामाशी संबंधित कोणत्याही रिक्वेस्टला त्वरित प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचं करारामध्ये नमूद करण्यात आलेलं. मात्र कंपनी व्यवस्थापकांच्या लक्षात आले की ली वारंवार कामावर गैरहजर राहायचा. तेव्हा त्यांनी एका चॅट ॲपद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ली याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
नंतर कंपनीने ली याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याला थेट नोकरीवरुन काढता येणार नाही म्हणून तो फार जास्त काळ बाथरुमचा वापर करतो हे सिद्ध करण्यासाठी कंपनीने वेगवेगळया माध्यमातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. नंतर कंपनीने हे पुरावे ज्यामुळे कंपनीच्या कॉरीडोअरमधील सीसीटीव्ही फुटेजचाही समावेश होता ते न्यायालयात सादर केले. कंपनीने दावा केला की ली सोबत केलेल्या करारामधील अटींनुसार, परवानगीशिवाय ठराविक कालावधीसाठी आपले काम आणि डेस्क सोडून जाणे हा गैरहजेरीचा प्रकार मानली जातो. या हिशोबाने 180 दिवसांच्या आत एकूण तीन कामाच्या दिवसांसाठी गैरहजर राहिल्यास अशा कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरून काढून टाकण्याचा अधिकार कंपनीला असल्याचं कंपनीने सांगितलं. कंपनीने त्याला कामावरून काढून टाकण्यापूर्वी कामगार संघटनेची परवानगीही घेतली होती, असंही न्यायालयाला सांगितलं.
लीने स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यायालयासमोर अनेक पुरावे सादर केले. त्याने गेल्याच वर्षी मे आणि जूनमध्ये त्याच्यासाठी जोडीदाराने ऑनलाइन खरेदी केलेली मूळव्याधीची औषधांची बिलं सादर केली. तसेच याच वर्षी जानेवारीतील रुग्णालयात केलेल्या शस्त्रक्रियेसंदर्भातील कागदपत्रेही ली याने न्यायालयासमोर सादर केली. माझ्या या नाजूक प्रकृतीमुळेच माल दिर्घकाळ ब्रेक घ्यावे लागले. ली याने कंपनीवरच उलट दावा करताना आपल्याला कंपनीने कराराचा भंग करुन बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकल्याबद्दल 3 लाख 20 हजार युआन म्हणजेच 40 लाख 30 हजार रुपये भरपाई मागितली.
मात्र न्यायालयाने ली याचं बोलणं ऐकून घेतलं नाही. न्यायालयाने असा निर्णय दिला की, ली याने ऑफिसच्या तासांदरम्यान बाथरूममध्ये घालवलेला वेळ त्याच्या शारीरिक गरजेपेक्षा 'खूप जास्त' होता. लीने त्याच्या कराराच्या आवश्यकतेनुसार कंपनीला त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली नव्हती किंवा आगाऊ रजेसाठी अर्ज केला नव्हता, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं.
दोन सुनावण्यानंतर, न्यायालयाने दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. कंपनीला ली याने कंपनीसाठी दिलेल्या योगदानाचा आणि बेरोजगारीच्या त्रासाचा विचार करून त्याला 30 हजार युआन 3 लाख 76 हजार रुपयांचा भत्ता देऊन प्रकरण मिटवण्यास मंजुरी दिली.