Air India Plane Crash नंतर चर्चेत आलेल्या Boeing आणि Airbus चा नेमका अर्थ, त्यातील फरक काय?

Airbus vs Boeing Difference: एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर काही गोष्टी सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. बोईंग आणि एअरबस हे शब्दसुद्धा त्याच चर्चेचा एक भाग...

सायली पाटील | Updated: Jun 16, 2025, 03:05 PM IST
Air India Plane Crash नंतर चर्चेत आलेल्या Boeing आणि Airbus चा नेमका अर्थ, त्यातील फरक काय?
Did you know the Difference between Airbus vs Boeing

Airbus vs Boeing Difference: विमानाचा प्रवास करणं असो किंवा मग विमानाविषयीची सखोल चर्चा असो. तिथं बोईंग आणि एअरबस या शब्दांचा उल्लेख होतोच. सध्या मात्र हे शब्द एका दुर्दैवी घटनेमुळं चर्चेत आले असून ती घटना म्हणजे काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची.

मागील काही दिवसांपासून बोईंग आणि एअरबस या शब्दांनी अनेकांचेच कान टवकारले आहेत. याच दोन शब्दांचा नेमका अर्थ काय आणि त्यांच्यात नेमका काय फरक असतो हे पाहून घ्या. हे दोन्ही विमानाचे प्रकार असून योग्य माहिती असल्यास विमानतळावर बोईंग आणि एअरबस ओळखता येतात.

विमानाचं नाक- सहसा बोईंग विमानाचं पुढचं टोक अर्थात विमानाच्या नाकाचा भाग टोकदार असतो. पाहताना तो एखाद्या बाणात्या तीक्ष्ण टोकासारखा भासतो. तर, एअरबस विमानांची नाकं काहीशी वर्तुळाकार आणि चपटी असतात.

इंजिनचा आकार – बोईंगचे इंजिन वरुन वर्तुळाकार आणि खालच्या बाजुनं सपाट असतात. हे इंजिन पंखांच्या पुढे असतात. तर, एअरबसचे इंजिन वर्तुळाकार असून बरोबर पंखांखाली असतात.

कॉकपिटच्या खिडक्या- बोईंगच्या कॉकपिट खिडक्या खालच्या बाजूस V आकारात काहीशा तिरप्या असतात आणि या खिडक्यांची टोकं तीक्ष्ण असतात. तर एअरबसच्या कॉकपिटला असणाऱ्या खिडल्या चौकोनी असून त्यांचं वरील टोक काहीसं तुटलेलं भासतं.

विमानाची शेपटी – बोईंग विमानांची शेपटी हलक्या उतारां विमानाच्या बॉडीला अर्थात इतर भागाला जोडलेली असते. तर, एअरबसची शेपटी ही सरळ रेषेतच विमानाच्या इतर भागाला जोडलेली असते.

लँडिंग गिअर – बोईंगचं उड्डाण झाल्यानंतर रिअर लँडिंग गिअरचा काही भाग बाहेरुन पाहायला मिळतो. त्यावर कोणतंही आवरण नसतं. तर, एअरबसचे रिअर गिअर अर्थात मागील गिअर हे पूर्णपणे विमानात दिसेनासे होतील अशा रितीनं बंद होतात.

अनेकदा विमानतळावर गेलं असता तिथं विमानात बसेपर्यंतचा मोकळा वेळ हातात असतो. अशा वेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न पडला असेल कर काचेतून दिसणारी विमानं पाहून एकदा हे बोईंग आणि एअरबसचं निरीक्षण करून पाहाच.