6 महिन्यांत अमेरिकेला ट्रम्प नकोसे! देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले; संघर्ष चिघळला

Protest Against Donald Trump in US: लोक रस्त्यावर उतरले असून लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न दिसून येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2025, 12:13 PM IST
6 महिन्यांत अमेरिकेला ट्रम्प नकोसे! देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले; संघर्ष चिघळला
12 राज्यांमध्ये पसरलं आंदोलन (फोटो रॉयटर्स आणि सोशल मीडियावरुन साभार)

Protest in USA Against Donald Trump: अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वीच सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील 12 राज्यांतील 25 शहरांमध्ये निदर्शने आणि हिंसक आंदोलने सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी नॅशनल गार्ड सैन्य व मरीन तैनात केल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिक आक्रमकपणे निदर्शने करण्याचा निर्णय घेतल्याने संघर्ष चिघळला आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर हजारो लोकांची धरपकड करण्यात येत आहे.

काय सुरु आहे अमेरिकेत?

वॉशिंग्टनपासून सिएटल, ऑस्टिन, शिकागोपर्यंत मोर्चेकरी ट्रम्प प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट एजन्सीविरुद्ध हातात फलक घेऊन विविध मार्गावर व कार्यालयांबाहेर वाहतूक रोखून धरली जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलन शांततेत होत असताना त्यांना पोलिसांच्या बडग्याचा सामना करावा लागला. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आला. आंदोलक काही दिवसांत यापेक्षा मोठ्या निदर्शनांची योजना आखत असल्याने आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

... अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते: ट्रम्प

निदर्शनांनी ढवळून निघालेल्या लॉस एंजिलिसमध्ये केलेल्या सैन्य कारवाईचं ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. लॉस एंजिलिसमध्ये  मी सैन्य पाठवले म्हणून बरे झाले. अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्येच अमेरिकी नागरिकांना ट्रम्प यांची धोरणं नकोशी झाल्याचं चित्र दिसत आहे.

सोशल मीडिया स्टारने अमेरिका सोडली

लाखो फॉलोअर्स असलेला जगातील लोकप्रिय टिकटॉकस्टार खाबी लेने त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेतून निघून गेला. 

कुठे काय घडले?

शिकागो : निदर्शकांची संख्या एक हजारपर्यंत वाढली होती.

सिएटल : सर्वांना मुक्त करा, आयसीई रद्द करा, हद्दपारी करू नका, असे फलक हातात धरत लोकांनी आंदोलन केले. 

बोस्टन : शेकडो लोकांनी आंदोलन केले. डेन्व्हर, सेंटा अॅना, ऑस्टिन, डल्लास व वॉशिंग्टनमध्येही आंदोलन केले गेले. 

सॅनफ्रान्सिस्को : इमारतींची तोडफोड, वाहने, पोलिस वाहनांचे नुकसान.

न्यूयॉर्क शहर : पोलिस बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली.

अमेरिकेत सुरु असलेल्या या आंदोलनांकडे जगभरातील देशांचं लक्ष आहे. ही आंदोलन चिरडून टाकण्याचा ट्रम्प यांचा डाव असला तरी मोठ्या संख्येनं आंदोलन रस्त्यावर उतरत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये संघर्ष अधिक टोकाचा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.