Apple Iphone: आयफोन हा आताच्या पिढीसाठी स्टेटस सिम्बॉल बनलाय. आपल्याकडे आयफोन असावा असे अनेकांना वाटते. काहीजण कितीही महाग असला तरी आयफोनची प्रत्येक नवी सिरीज घेण्याचा प्रयत्न करतात. या आयफोनसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलीय. आयफोनचा भारतात मोठा प्लांट येणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु होती. पण यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
भारतात Apple iPhone च्या उत्पादनावर डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. यापूर्वीही त्यांनी अॅपलला याबद्दल इशारा दिला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड धमकी दिलीय. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना कडक इशारा दिलाय. जर कुक यांनी भारतात आयफोन बनवले तर त्यांना टॅरिफला सामोरे जावे लागेल असे सांगत अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेतच बनवावेत, असे ट्रम्प म्हणाले. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी अॅपलवर टॅरिफ बॉम्ब टाकण्याची धमकी दिलीय. जर त्यांनी भारतात किंवा इतर कोणत्याही देशात आयफोन बनवले तर त्यांना किमान 25 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल, असेही ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात आयफोनच्या निर्मितीवर नाराजी व्यक्त केली आणि ट्रुथ सोशलवर एक पोस्ट लिहून ही धमकी दिली. ट्रम्प यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, 'मी यापूर्वी अॅपलच्या टिम कुकलाही हे समजावून सांगितले होते. अमेरिकेत विकला जाणारा आयफोनदेखील अमेरिकेतच बनवला जाईल, भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नाही. जर असे झाले नाही तर अॅपलला अमेरिकेत किमान 25 टक्के टॅरिफ भरावा लागेल.'
ट्रम्प यांनी देशांना किंवा कंपन्यांना शुल्क आकारून धमकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अॅपलला भारतात उत्पादन थांबवण्यास सांगितले होते. पण कंपनीने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. अॅपल भारतात दर 5 आयफोनपैकी एक असेंबल करते. याचा अर्थ कंपनी तिच्या एकूण आयफोन उत्पादनापैकी सुमारे 20% उत्पादन भारतात करते. कंपनी भारतात उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सतत गुंतवणूक करत आहे. ते 20% वरून 60% पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अॅपलचा मुख्य उत्पादन आधार चीनमध्ये आहे. पण टॅरिफ अनिश्चितता वाढल्यानंतर ते तेथून भारतासह इतर देशांमध्ये त्यांचे उत्पादन हलविण्याची योजना आखतायत.