'तुम्हाला जी हवी ती निवडा,' डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी 5 टेस्ला कार घेऊन पोहोचले एलॉन मस्क, अखेर राष्ट्राध्यक्षांनी...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांच्यासह व्हाईट हाऊसच्या (White House) साऊथ लॉनमध्ये पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान यावेळी व्हाईट हाऊस टेस्ला शोरुममध्ये रुपांतरित झालं होतं.   

शिवराज यादव | Updated: Mar 12, 2025, 09:57 AM IST
'तुम्हाला जी हवी ती निवडा,' डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी 5 टेस्ला कार घेऊन पोहोचले एलॉन मस्क, अखेर राष्ट्राध्यक्षांनी...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं निवासस्थान असणारं व्हाईट हाऊस (White House) मंगळवारी जणू टेस्ला (Tesla) कारच्या शोरुममध्ये रुपांतरित झालं होतं. कंपनीचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) टेस्लाच्या पाच कार घेऊन व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी लॉनमध्ये पाचही कारसाठी फोटोग्राफरसाठी पोझ दिल्या. यानंतर त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना तुमच्या आवडीची कार निवडा असं सांगितलं. ट्रम्प यांनी लाल रंगाची कार निवडत, ही फार सुंदर असल्याचं सांगितलं आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासह व्हाईट हाऊसच्या (White House) साऊथ लॉनमध्ये पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान यावेळी व्हाईट हाऊस टेस्ला शोरुममध्ये रुपांतरित झालं होतं. येथे टेस्लाच्या पाच आलिशान गाड्या व्हाईट हाऊसची शोभा वाढवत होत्या. ट्रम्प यांनी यावेली ईव्ही कंपनीचे प्रमुख मस्क यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी लाल रंगाच्या कारला पसंती दिली. 

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलॉन मस्क यांनी जाहीरपणे ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. तसंच प्रचारातही ते सक्रीयपणे सहभागी झाले होते. ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तेव्हा मस्क यांना किंगमेरच्या भूमिकेतून पाहण्यात आलं. ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सरकारी दक्षता विभागाची जबाबदारी सोपवली आहे. अमेरिका अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयांमध्येही मस्क यांचा सहभाग दिसू लागला आहे. मस्क यांच्या धोरणांमुळेच टेस्ला कंपनी घटणारी विक्री आणि शेअर्सच्या किंमतींचा सामना करत असल्याचं बोललं जात आहे. 

मस्क यांना पाठिंबा देण्यासाठी ट्रम्प यांनी खरेदी केली कार

मंगळवारी ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मस्क यांना पाठिंबा देण्यासाठी टेस्ला कंपनीची कार खरेदी करण्याची योजना आखत असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर काही तासात टेस्लाने आपल्या पाच कार व्हाईट हाऊसमध्ये पोहोचवल्या आणि ट्रम्प यांना दाखवण्यासाठी ड्राइववेवर पार्क केल्या. 

ट्रम्प तिथे पोहोचल्यानंतर मॉडल एसच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले. ट्रम्प यांनी कार पाहिल्यानंतर ही फार सुंदर असून, पूर्णपणे कम्प्यूटराइज्ड असल्याचं म्हटलं. यावेळी मस्क यांनी मस्करी, सिक्रेट सर्व्हिसला हार्ट अटॅक येऊ शकतो असं सांगितलं. दोघेही ही कार काही सेकंदात कशाप्रकारे ताशी 95 किमीचा वेग पकडू शकते यावर चर्चा करत होते. 

ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, आपण कारसाठी चेक देणार आहोत. याची किंमत 80 हजार डॉलर्स आहे. ही कार आपण व्हाईट हाऊसमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरुन स्टाफ वापरु शकेल. ट्रम्प यांनी यावेळी मस्क यांचं कौतुक करताना, हे फार चांगलं प्रोडक्ट आहे. आपल्याला आनंद साजरा करायला हवा असं म्हटलं. आपण त्यांना वाव दिला पाहिजे असं मतही मांडलं.