लाहोर: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने स्थापन केलेल्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या मान्यता नसलेल्या राजकीय पक्षाची आणि त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उमेदवारांची फेसबूक खाती आणि पेजेस ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बंद करण्यात आली आहेत. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी पाक निवडणूक आयोगाशी संपर्क साधून विविध राजकीय पक्षांची बनावट फेसबुक खाती आणि पेजेस शोधून ती बंद करण्याच्या कामी स्थानिक अधिकाऱ्यांना मदत देऊ केली. त्यानुसार हाफिज सईदच्या पक्षाची आणि त्यांच्या उमेदवारांची फेसबुक खाती बंद केली आहेत.


फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे निवडणुकांमध्ये हस्तक्षेप होणार नाही, असे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोच्या निवडणुकांचा आधार घेत झुकरबर्ग यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.