ही तर अवकाशातली कॉलनी! 5 बेडरुमइतका मोठा आकार, 4.5 लाख किलो वजन... इथंच अडकलेल्या Sunita Williams

Sunita Williums Return Journey : नासाच्या विविध मोहिमांसाठी अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांच्याही नावाचा समावेश आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 17, 2025, 03:28 PM IST
ही तर अवकाशातली कॉलनी! 5 बेडरुमइतका मोठा आकार, 4.5 लाख किलो वजन... इथंच अडकलेल्या Sunita Williams
international space station sunita williams nasa life schedule speed latest update

Sunita Williums Return Journey : नासाच्या (NASA) वतीनं अवकाशात गेलेल्या सुनिता विलियम्स यांचा मुक्काम अनपेक्षितरित्या वाढला आणि त्यांच्या या मोहिमेचं साक्षीदार संपूर्ण जग झालं. आता याच अवकाशातील 9 महिन्यांचा मुक्काम संपवून अमेरिकेच्या या अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यास सज्ज झाल्या आहेत. तत्पूर्वी त्या अवकाशातील त्या विस्तीर्ण विश्वात नेमका कुठं राहिल्या होत्या माहितीये? 

ही तर अवकाशातील एक कॉलनी... 

सुनिता विलियम्स आणि बरेच अंतराळवीर त्यांच्या अवकाश मोहमेदरम्यान अगदी सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करतात. हे ठिकाण एखाद्या अवकाशातीलच कॉलनीहून कमी नाही. हे ठिकाण आहे आंतरराष्ट्रीय अवकाश तळ म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS). हे तेच ठिकाण आहे जिथून 24 तासांमध्ये 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त दिसतो. 

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे एखादी स्थायी वास्तू किंवा बांधकाम नसून ही स्थिर रचनाही नाहीय, तर सतत फिरतं असणारं हे एक यान आहे जे सतत पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतं. पृथ्वीपासून हे यान साधारण 403 किमी अंतरावर स्थित असून त्याचा वेग आहे 17500 मैल प्रति तास. थोडक्यात ताशी 28163 किमी इतक्या वेगानं हे यान पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतं. 

किती मोठं आहे स्पेस स्टेशन? 

नासा (NASA) च्या माहितीनुसार हे यान एखाद्या पाच बेडरूमच्या फ्लॅटइतकं मोठं आहे. साधारण दोन बोईंग 747 जेटलायनर इतकं ते मोठं असून, तिथं 6 जणांची टीम आणि काही इतर अंतराळवीर वास्तव्य करू शकतात. सध्याच्या घडीला याच स्पेस स्टेशनवर 8 अंतराळवीर वावरत आहेत.  पृथ्वीभोवती फिरणाऱ्या या अंतराळयानाचं वजन 453592.37 किलोग्रॅम इतकं असून सर्व बाजूंनी त्याचा आकार पाहिल्यास तो एखाद्या फुटबॉलच्या मैदानाइतका मोठा ठरतो. इथं अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपाची प्रयोगशाळा असल्याचं म्हटलं जातं. 

हेसुद्धा वाचा : 'मुघल' हा शब्द आला तरी कुठून आणि त्याचा अर्थ आहे तरी काय? 

हे स्पेस स्टेशन पृथ्वीभोवतीची एक फेरी 90 मिनिटांत पूर्ण करतं. अर्थात त्यावर 45 मिनिटं सूर्यप्रकाशामुळं दिवस असतो तर, 45 मिनिटं रात्र असते. पृथ्वीचा व्यास 12742 किमी असून, स्पेस स्टेशनच्या कक्षेची उंची 400 किमी इतकी आहे ज्यामुळं ते इतक्या वेगानं पृथ्वीभोवती फेरी मारतं. 

राहिला मुद्दा हे स्पेस स्टेशन किती जुनं आहे? तर, 1998 मध्ये स्पेस स्टेशनचा पहिला टप्पा लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये पुढील दोन वर्षांमध्ये आणखी काही भाग जोडण्यात आले होते आणि तेव्हात हे ठिकाण राहण्यायोग्य झालं. काळानुरूप इथं अनेक गोष्टी जोडण्यात आल्या आणि अखेर 2011 मध्ये त्यातील कामं पूर्ण झाली. स्पेस स्टेशनमध्ये असणारे अंतराळवीर एका अनोख्या विश्वात जगत असून, तिथं ही मंडळी कामासोबतच काही आनंदाचे क्षणही व्यतीत करतात हेच खरं.