Katy Perry NS-31 mission: पॉप स्टार केटी पेरीसह 5 महिलांनी सोमवारी 14 एप्रिल रोजी अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या खाजगी कंपनी ब्लू ओरिजिनच्या रॉकेटमधून अंतराळ प्रवास केला. 1963 नंतर पहिल्यांदाच महिलांचा समावेश असलेला क्रू अंतराळात गेला होता. केटी पेरीसोबत अंतराळात प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये चित्रपट निर्मात्या कॅरिन फ्लिन, नासा रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोस, बायोअस्ट्रोनॉटिक्स संशोधक अमांडा गुयेन, टीव्ही व्यक्तिमत्व गेल किंग आणि पत्रकार लॉरेन सांचेझ यांचा समावेश होता.
हे मिशन साधारण 11 मिनिटे चालले. ज्यामध्ये न्यू शेपर्ड रॉकेटने महिलांना पृथ्वीपासून 100 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर नेले. कर्मन रेषा म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेली अवकाश सीमा त्यांनी ओलांडली. खाली उतरण्यापूर्वी काही मिनिटे त्यांनी वजनहीनतेचा अनुभव घेतला. या काळात केटी पेरीने इतर महिलांसोबत अंतराळात जाऊन आणि येऊन असा एकूण 212 किलोमीटरचा प्रवास केला.
ब्लू ओरिजिन ही जेफ बेझोसची अंतराळ कंपनी आहे. अंतराळात प्रत्येकासाठी जागा उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या रॉकेटमध्ये बसवलेल्या कॅप्सूलमध्ये मोठ्या खिडक्या आहेत. ज्याद्वारे अंतराळवीर पृथ्वीचे अद्भुत दृश्य पाहू शकतात. उड्डाणानंतर पॅराशूटच्या मदतीने रॉकेट टेक्सासच्या वाळवंटात सुरक्षितपणे उतरले.
हे अभियान केवळ तांत्रिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातूनही विशेष ठरले. लॉरेन सांचेझने सर्व महिला क्रू सदस्यांसाठी खास निळे जंपसूट डिझाइन करण्यात आले होते. ज्यावर नासा आणि ब्लू ओरिजिनच्या लोगोसह त्यांच्या नावांचे पॅच होते. या मिशनच्या सदस्या विज्ञान, माध्यमे, अंतराळ संशोधन आणि मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रातील महिलांना प्रेरणा देत आहेत. त्यांची निवडही याच आधारावर करण्यात आली होती. महिलांमध्ये इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता आहे हा संदेश त्यांनी जगभरात पोहोचवला.
ब्लू ओरिजिन रॉकेटवरून 11 मिनिटांचा अंतराळ प्रवास करण्यासाठी 1.15 कोटी रुपये खर्च येतो. केटी पेरीसोबत अंतराळात प्रवास करणाऱ्या काही महिलांनी मोफत प्रवास केला. ब्लू ओरिजिनचे प्रवक्ते बिल किर्कोस यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान याबद्दल खुलासा केला.
सेलिब्रिटी नेट वर्थनुसार अमेरिकन गायिका, संगीतकार आणि टेलिव्हिजन जज केटी पेरी यांची अंदाजे एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर इतकी आहे. पेरी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सप्टेंबर 2023 मध्ये तिने तिची गाणी लायब्ररी लिटमस म्युझिकला 225 दशलक्ष डॉलर्सना विकली.
ब्लू ओरिजिनचे रॉकेट अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे आठ वाजता प्रक्षेपित झाले. 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या अंतराळ मोहिमेत सर्व महिला कर्मचाऱ्यांसह उड्डाण केले. यापूर्वी 1963 मध्ये रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांनी एकट्याने अंतराळ प्रवास केला होता. या मोहिमेत केटी पेरी आणि तिची सर्व महिला टीम सुमारे 4 मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणात राहिले. यानंतर 3 पॅराशूटच्या मदतीने कॅप्सूल सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.