)
El Nino Monster Wave : अल निनोच्या प्रभावामुळे जगात हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर देखील झाला आहे. त्यातच आता अल निनोबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पॅसिफिक महासागरात काहीतरी भयानक घडत आहे, ज्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पॅसिफिक महासागरात उष्ण पाण्याची 14,500 किलोमीटर लांबीची उष्ण पाण्याची एक प्रचंड लाट महासागरात स्थिरपणे पुढे सरकत आहे. यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे.
पॅसिफिक महासागरात उसळलेली ही लाट इंडोनेशियातून उगम पावत असून हळूहळू दक्षिण अमेरिकेकडे सरकत आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची हवामान संस्था NOAA ने 11 जून रोजी अल निनोचा प्रभाव पुन्हा वाढू शकतो याची पुष्टी केली आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही लाट कोणत्याही जहाजाला किंवा माणसाला दिसली नाही. अवकाशातील नासाच्या सेंटिनेल-6 मायकेल फ्रेलिच उपग्रहाने ही लाट कॅमेऱ्यात कैद केली आहे.
जिथे जिथे गरम पाणी समुद्रापर्यंत पोहोचले, तिथे समुद्राची पातळी सुमारे 15 सेंटीमीटरने वाढली. या बदलावरून असे सूचित झाले की, समुद्राच्या आत एक मोठी हालचाल होत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. यामुळे अल निनोचा परिणाम पुन्हा एकदा होऊ शकतो.
अल निनो हा महासागर आणि हवामानातील एक नैसर्गिक बदल आहे. सामान्यतः, पॅसिफिक महासागरातील वारे उष्ण पाणी इंडोनेशियाकडे ढकलतात, ज्यामुळे थंड पाणी दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ येते. तथापि, जेव्हा हे वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा बदलते, तेव्हा उष्ण पाणी पुन्हा पूर्वेकडे सरकू लागते. यालाच अल निनो म्हणतात.
शास्त्रज्ञ उष्ण पाण्याच्या या लाटेला 'केल्विन लाट' म्हणतात. उष्ण पाणी थंड पाण्यापेक्षा जास्त जागा व्यापते. परिणामी समुद्राचा पृष्ठभाग किंचित वर येतो. यामुळेच उपग्रह हा बदल सहजपणे ओळखू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, या वर्षीचा अल निनो खूप तीव्र असू शकतो. NOAA च्या मते, पॅसिफिक महासागराचे तापमान सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढण्याची 63 टक्के शक्यता आहे. असे झाल्यास. तापमान वाढल्यास याचा परिणाम 1997 आणि 2015 च्या शक्तिशाली अल निनोसारखा असू शकतो.
अल निनोचा प्रभाव भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो. कारण तीव्र अल निनोचा मान्सूनवर परिणाम होतो. यामुळे कधीकधी पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे दुष्काळ पडू शकतो. कृषी आणि पाणीटंचाई यांसारख्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हिंद महासागरातील इतर हवामान परिस्थिती या उष्ण लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतात. या वर्षाच्या अखेरपर्यंत अल निनो पूर्णपणे सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे, जगभरातील हवामान संस्था समुद्रातील या बदलांवर सतत लक्ष ठेवून आहेत, कारण त्याचा परिणाम केवळ एका देशाच्या हवामानावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर होऊ शकतो.