हाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय.
लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय. पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री शहरयार आफ्रिदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते २६/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईदची भलामण करत असताना दिसत आहे.
आपला पक्ष सत्तेत आहे, तोपर्यंत हाफीजला कुणीही हात लावू शकत नाही, अशी ग्वाहीच आफ्रिदी देत आहे. 'मिली मुस्लिम लिग' या पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या एका बैठकीदरम्यान हा संवाद झालाय. हाफीज सईदला अमेरिकेनं फरार घोषित केलं असून त्याच्या डोक्यावर इमानही लावले आहे.
एकीकडे पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढण्याच्या वल्गना करत असताना दुसरीकडे एका मंत्र्याने अमेरिकेला वाकुल्या दाखवल्याचं या घटनेमुळे उघड झाले आहे. पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे पुढे आलेय. पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादी नाहीत, अशी वारंवार माहिती देण्यात येते. मात्र, या व्हिडिओवरुन पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.