बेपत्ता भारतीय विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकीच्या पालकांना त्यांच्या मुलीला मृत घोषित करून हे प्रकरण बंद करावं अशी इच्छा व्यक्त केल्याचं अधिकाऱ्यांनी सीएनएनला सांगितलं आहे. कोनांकीच्या कुटुंबीयांचे वास्तव्य असलेल्या व्हर्जिनियामधील लाउडाउन काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की, "डोमिनिकन कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलीचा अपघाती बुडून मृत्यू झाल्याची कबुली द्यावी, या त्यांच्या विनंतीला पूर्णविराम द्यावा, या त्यांच्या शोकाकुल पालकांच्या इच्छेला त्याचं समर्थन आहे". अंतिम निर्णय डोमिनिकन प्रशासनाचा असेल.
६ मार्च रोजी डोमिनिकन रिपब्लिकमधील पुंता कॅना समुद्रकिनाऱ्यावरून बेपत्ता झाल्यापासून सुदीक्षाचा मृतदेह सापडलेला नाही. सीएनएनने मिळवलेल्या पत्रात कोनांकी कुटुंबाने म्हटलं आहे की, कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याने त्यांना शोक करण्यास आणि संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
दरम्यान तपास अधिकाऱ्यांना सुदीक्षाचा बुडून मृत्यू झाला असावा याची खात्री पटत आहे. त्यांना कोणताही गुन्हेगारी पुरावा सापडलेला नाही. यामुळे प्रशासनाने तिचा मृत्यू झालाचं कायदेशीर जाहीर करण्याची सुरुवात करण्यास सांगितलं आहे.
शेरीफ माईक चॅपमन म्हणाले की, कोनांकी बुडाल्याचे तपासकर्त्यांना वाटत असले तरी तिच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही आणि प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. डोमिनिकन रिपब्लिकमधील अधिकारी त्यांची चौकशी सुरू ठेवत आहेत आणि कायदेशीर तज्ज्ञांनी एखाद्या व्यक्तीला मृतदेहाशिवाय मृत घोषित करणे ही देशातील एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असं नमूद केलं आहे. अँटर्नी ज्युलिओ क्युरी यांच्या मते, अशा घोषणेस काँग्रेस किंवा राष्ट्रपतींची विशेष मान्यता आवश्यक असेल.
मृत्यूची कायदेशीर घोषणा झाल्यास कुटुंबाला कॉलेज सेव्हिंग प्लॅन आणि विमा योजना यासारख्या आर्थिक बाबी सोडवण्याची परवानगी देईल. जोपर्यंत मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं जात नाही तोपर्यंत हे कायदेशीरदृष्ट्या अडचणीत राहतात.
मंगळवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कोनांकीचे वडील म्हणाले, "आमची मुलगी बुडाली हे आम्हाला खूप दुःखाने आणि जड अंतःकरणाने मान्य होत आहे. आमच्यासाठी हे सहन करणं खूप कठीण आहे".
पिट्सबर्ग विद्यापीठाची विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी 3 मार्च रोजी तिच्या पाच मैत्रिणींसह पुंता कॅना येथे पोहोचली. सीसीटीव्हीत ती रिउ रिपब्लिका हॉटेल बारमध्ये मद्यपान करताना दिसत आहे. नंतर मित्रांसह ती समुद्रकिनाऱ्यावर जाते, ज्यामध्ये जोशुआ रिबेही होता. पहाटे 4.15 वाजता हे सर्व समुद्रकिनाऱ्यावर जाताना दिसले. 5 वाजता कोनांकी वगळता सर्वजण परत आले होते.
डोमिनिकन रिपब्लिकमधील अधिकाऱ्यांनी रिबेचा पासपोर्ट जप्त केला आहे, जो सुदीक्षासह शेवटचा दिसला होता. त्याची सहा तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. पण तो संशयास्पद वाटला नाही. चौथ्यावेळी रिबेने लाटेने ओढल्यानंतर तिला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचं मान्य केलं.