लाहोर: नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात निवडणूक लढवली तर ते सहजपणे जिंकतील, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले आहेत. यावेळी इम्रान खान यांनी आपल्या भाषणात म्हटले की, माझ्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानमध्ये आल्यामुळे सिद्धू यांच्यावर बरीच टीका झाल्याचे मी ऐकले. यासाठी त्यांच्यावर टीका का होतेय, हे मला कळत नाही. त्यांनी केवळ शांतता आणि बंधुभावाची भाषा केली होती. आता तर सिद्धू पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात निवडणुकही लढवू शकतात. ते सहजपणे जिंकतील, असे इम्रान खान यांनी म्हटले. 



यावेळी इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरही भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता केवळ एकच समस्या उरली आहे ती म्हणजे काश्मीर. हा प्रश्न सोडवायचा असेल तर दोन्ही देशांमध्ये तितकेच सक्षम नेतृत्व हवे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले तर किती सकारात्मक परिणाम साधले जातील, याची कल्पना करुन पाहा. त्यामुळे  आपण आता पुढे जायला पाहिजे, पाकिस्तानलाही पुढे जायचे आहे. मग आपण केवळ एक समस्या सोडवू शकत नाही का, असा सवालही इम्रान खान यांनी उपस्थित केला.