)
Who Is Sushila Karki: भारताच्या शेजारील नेपाळमध्ये मागील चार दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना सुरु असतानाच आता यावर तोडगा काढण्यासाठी जोरदार हलचाली सुरु झाल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू आणि 300 हून अधिकजण जखमी झालेल्या या आंदोलनामध्ये आता एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. आंदोलनकर्त्या जनरेशन झेडच्या प्रतिनिधींनी चक्क 73 वर्षीय महिलेकडे देश सोपवण्यासाठी आपली सहमती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच आता भारताच्या या शेजाऱ्याचं भविष्य ही महिला बदलणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
नेपाळमध्ये ‘जनरेशन झेड’ने सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरु केलेल्या आंदोलनाचं रुपांतर नंतर भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात झालं. या आंदोलनाच्या नावाखाली नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. सरकारविरोधातील तरुणाची आक्रमक भूमिका आणि हिंसाचारामुळे अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या संसदेसहीत अनेक मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले. नेपाळचे सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींनाही आग लावण्यात आली. आजी-माजी मंत्र्यांना पळून पळून मारण्यात आल्याचे व्हिडीओही समोर आले. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता हे नाव मागे पडलं आहे. विशेष म्हणजे शाह यांनी आपल्याला यामध्ये रस नसल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता एका महिलेचं नाव समोर आलं आहे.
'जनरेशन झेड'च्या प्रतिनिधींनी ज्या व्यक्तीच्या नावावर सहमती दर्शवली आहे त्यांचं नाव आहे सुशीला कार्की! माजी न्यायाधीश असलेल्या सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या सुशीला कार्की यांच्या नावाला आंदोलकांचं समर्थन असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सध्याच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आंदोलकांच्या एका गटासोबत ऑनलाईन चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये 5 हजारहून अधिक तरुणांनी सहभाग नोंदवला. या सर्वांचाच सुशीला कार्की यांना पाठिंबा असल्याचं चर्चेदरम्यान दिसून आलं. त्यामुळेच देशातील परिस्थिती अजून बिघडू नये म्हणून कार्कींकडे कारभार सोपवला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Former Chief Judge Sushila Karki to Support Genz at New Baneshwor. pic.twitter.com/ZnAPGO2Zit
— Dr Abhishek Raj Singh (@SinghR_Abhishek) September 9, 2025
सर्वाधिक पाठिंबा कार्की यांना मिळाला असला तरी त्यांनीही एक मागणी ठेवल्याचं सांगितलं जात आहे. आपल्याला किमान एक हजार जणांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पाठिंब्याचं पत्र हवं असल्याचं कार्की यांचं म्हणणं असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. यानंतर अडीच हजारहून अधिक स्वाक्षऱ्या असलेलं पत्र देत कार्की यांच्यासाठी समर्थनपत्र तयार करण्यात आलं आहे. मात्र कार्की यांनी यासंदर्भात कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.
> सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत.
> नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून सुशीला कार्की यांना ओळखलं जातं.
> तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील संविधानिक परिषदेच्या शिफारशीवरून 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्यांची नियुक्ती केली होती.
> न्यायपालिकेत प्रवेश करण्यापूर्वी कार्की या शिक्षिका होत्या.
> कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी विराटनगरमध्ये झाला.
> 1979 साली कार्की यांनी वकिली करण्यास सुरुवात केली.
> 1985 साली कार्की यांनी महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
> 2007 साली कार्की वरिष्ठ वकील म्हणून पुन्हा न्यायपालिकेमध्ये कार्यरत झाल्या.
> 22 जानेवारी 2009 रोजी कार्की यांना सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं.
> 2010 मध्ये कार्की स्थायी नाय्याधीश म्हणून नियुक्त झाल्या.
> 2016 मध्ये कार्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या.
> 11 जुलै 2016 ते 7 जून 2017 दरम्यान त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली.
नेपाळमध्ये सध्या कोणत्या कारणामुळे अराजक निर्माण झालं आहे?
नेपाळमध्ये ‘जनरेशन झेड’ने सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू केलेलं आंदोलन नंतर भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात रूपांतरित झालं. या आंदोलनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे, ज्यामुळे संसद, सर्वोच्च न्यायालय आणि मंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाले. यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे.
या आंदोलनामुळे कोणत्या प्रमुख घटना घडल्या?
आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या संसदेला, सर्वोच्च न्यायालयाला आणि अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली. आजी-माजी मंत्र्यांना मारहाण झाल्याचे व्हिडीओही समोर आले. या हिंसाचारामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला.
सुशीला कार्की कोण आहेत?
सुशीला कार्की या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत. सध्या त्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी प्रबल दावेदार मानल्या जात आहेत, कारण ‘जनरेशन झेड’च्या आंदोलकांनी त्यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला आहे.