कोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा

वैज्ञानिकाच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Updated: Apr 21, 2020, 06:55 PM IST
कोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान माजलं आहे. 200हून अधिक देश या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचं काम अनेक वैज्ञानिक करत आहेत. परंतु काही सवाल आजही कायम आहेत की, कोरोना व्हायरस आला कुठून? त्याची उत्पत्ती कशी झाली? अनेक देशांनी चीनवर याचा आरोप लावला आहे. परंतु चीनकडून हे आरोप नाकारण्यात येत आहेत. आता नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक यांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधून पसरला असल्याचा दावा केला आहे.

2008 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारे फ्रान्सचे वायरोलॉजिस्ट लूक मॉटेंग्नियर (luc montagnier)  यांनी, चीनमधील प्रयोगशाळेत एड्सवरील लस बनवण्याच्या प्रयत्नांतून कोविड-19चा जन्म झाला असल्याचं सांगितलं आहे. लूक यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेत झाली असून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा लूक यांनी केला आहे. लस बनवण्याच्या प्रयत्नांतून हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणू तयार झाला असल्याचं ते म्हणाले. 

लूक यांनी HIV शोधात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. 

लूक यांनी असा दावा केला आहे की, एचआयव्ही आणि मलेरियाचे घटक कोरोना विषाणूच्या जीनोममध्ये  (Genome)  सापडले आहेत आणि त्यामुळे व्हायरस नैसर्गिकरित्या तयार होऊ शकत नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

लूक यांनी फ्रान्समधील एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वुहानची बायोसेफ्टी लॅब 2000 पासून कोरोना व्हायरसवर संशोधन करत आहे. त्यामुळे नोवेल कोरोना व्हायरस (Novel Corona Virus) एखाद्या प्रकारच्या औद्योगिक अपघाताचा परिणाम असू शकतो.

एशिया टाईम्सच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये 2000 पासून कोरोना विषाणूमध्ये तज्ज्ञ आहेत. कोविड -19  विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाला असल्याची चर्चा गेल्या अनेक आठवड्यांपासून जगभरात सुरु आहे.

चीनच्या प्रमुख वायरोलॉजी प्रयोगशाळेचे संचालक युवान झिमिंग यांनी वैज्ञानिकांचा हा दावा नाकारला आहे. कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला आहे हे त्यांनी स्पष्टपणे नाकारलं आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या पी4 लॅबमध्ये प्राणघातक विषाणूंवर अध्ययन केलं जातं. पण कोविड-19चा जन्म या प्रयोगशाळेत झाला असल्याची ही अफवा आहे. लॅबमध्ये काम करण्याचे नियम व कायदे अत्यंत कठोर असल्याचं त्यांनी सांगितलं.