भारताच्या 'पाकव्याप्त काश्मीर'च्या हवामान अंदाजामुळे पाकिस्तानचा जळफळाट

भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा तीळपापड

Updated: May 9, 2020, 05:35 PM IST
भारताच्या 'पाकव्याप्त काश्मीर'च्या हवामान अंदाजामुळे पाकिस्तानचा जळफळाट title=

इस्लामाबाद :  भारताने पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या मीरपूर, मुजफ्फराबाद आणि गिलगिट या भागाच्या हवामानाचा अंदाज सांगायला सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारत सरकारच्या मालकीचं असलेल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून शुक्रवारपासून प्राईम टाईम बुलेटिनमध्ये  पाकव्याप्त काश्मीरमधल्या हवामानाचा अंदाज सांगायला सुरुवात झाली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या या पावलावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताने मागच्यावर्षी बदललेल्या नकाशाप्रमाणेच त्यांचा हा निर्णय कायदेशीररित्या निरर्थक असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे.

काहीच दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर खाली करण्याचा इशारा दिला होता. गिलगिट, बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागात केलेला अवैध कब्जा तत्काळ सोडून द्यावा, असं पत्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लिहिलं होतं.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घ्यायचे आदेश दिले होते. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला भारताने तीव्र शब्दात विरोध केला होता. या विरोधाचं पत्र लिहिताना गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा भाग आहे. अपरिवर्तनीय फाळणी आणि कायदेशीरदृष्ट्या हा भारताचा भूभाग असल्याचं पाकिस्तानला स्पष्टपणे सांगण्यात आल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं.