नवी दिल्ली : मलेशियाच्या केलातनचे माजी शहेनशाह सुल्तान मोहम्मद पाचवे (Sultan Muhammad V) यांनी आपल्या पत्नीला 'तीन तलाक' दिल्याचं समोर येतेय. पत्नी आणि रशियाची माजी ब्युटी क्वीन ओक्साना वोइवोदीना (Oksana Voevodina) हिला 'तीन तलाक' देतानाच सुल्ताननं तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केलाय. इतकंच नाही तर ओक्साना हिचं दोन महिन्यांचं मूलही आपलं नसल्याचा दावा सुल्तान मोहम्मद यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सुल्तान आणि ओक्साना यांनी १ जुलै रोजी तलाकसाठी अर्ज दाखल केला होता. स्थानिक मीडियानुसार, सुल्तान मोहम्मद यांनी 'मुलाचा जैविक पिता मीच असल्याचा कोणताही पुरावा नाही' असा आरोप केलाय. 



५० वर्षीय सुल्तान मोहम्मदशी निकाह केल्यानंतर २७ वर्षीय ओक्साना हिनं इस्लाम कबूल केला होता. यावेळी तिनं आपलं नावही बदलून रिहाना ओक्साना पेट्रा असं नाव धारण केलं होतं. तिच्या मुलाचं नाव इस्माइल लायन असं ठेवण्यात आलंय. 



उल्लेखनीय म्हणजे, सुल्तान मोहम्मद पाचवा यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यातच ओक्साना हिच्यासोबत विवाह केला होता. त्यांच्या लग्नाच्या बातमीनंतर मॉडेल पत्नीचे बोल्ड फोटो आणि भूतकाळातील अनेक किस्से मलेशियात व्हायरल झाले होते. यामुळे मलेशियात मोठा वादही निर्माण झाला होता. लग्नाच्या बातम्यांनंतर सुल्तान मोहम्मदला याच वर्षी जानेवारी महिन्यात राजगादीवर पाणी सोडावं लागलं होतं. 



ब्रिटनमधून शिक्षण घेणाऱ्या मोहम्मद हे २०२१ पर्यंत मलेशियाच्या राजा म्हणून पदभार सांभाळणार होते. परंतु, ब्युटी क्वीन पत्नीसाठी त्यांनी राजपदही सोडलं. 



स्थानिक मीडियानुसार, रिहाना मॉस्कोहून सुल्तान आणि मुलासोबत मलेशियात परतली होती. गेल्याच आठवड्यात आपला अजून तलाक झाला नसून सुल्तान अजूनही आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. परंतु, सोबतच केतालन राज्यानं मंजूर केलेलं या दोघांच्या तलाकचं सर्टिफिकेटही सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. दुसरीकडे, 


रशियन मीडियानं केलेल्या दाव्यानुसार, सुल्तानकडून 'तीन तलाक'चं पाऊल उचललं गेलं असलं तरी त्यांची पत्नी मात्र याविरुद्ध आहे. 



ब्युटी क्वीन ओक्साना रशियन ऑर्थोपेडिक सर्जनची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी तिनं मिस मॉस्कोचा खिताब आपल्या नावावर केला होता.