BR Shetty Bankrupt: शून्यापासून सुरुवात करुन शिखरापर्यंत पोहोचलेल्या अनेक व्यावसायिकांच्या प्रेरणादायी कहाणी आपण वाचल्या असतील. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष केल्यानंतर एक विलासी जीवन त्यांच्या वाट्याला येते. पण श्रींमतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर रस्त्यावर आलेल्या व्यवसायिकांची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? असा एक व्यावसायिक ज्याने स्वतःहून अरब साम्राज्य निर्माण केले आणि नंतर एका छोट्याशा चुकीमुळे त्यांचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. यामागे कारण ठरले एक ट्विट.भारतीय उद्योगपती बीआर शेट्टींची कहाणी जाणून घेऊया.
कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि योग्य संधींचा फायदा घेऊन बीआर शेट्टी यशाच्या शिखरावर पोहोचले. ते न्यू मेडिकल सेंटर (एनएमसी) आणि यूएई एक्सचेंज आणि फिनाब्लर सारख्या कंपन्यांचे संस्थापक होते. व्यवसायांच्या लोकप्रियतेमुळे बीआर शेट्टी यांनी अवघ्या काही वर्षांत अब्जावधींचे साम्राज्य निर्माण केले आहे. 2019 मध्ये त्यांचा समावेश फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत झाला.
व्यावसायिक बीआर शेट्टी यांचा जन्म 1942 मध्ये कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कापू शहरातील एका सामान्य कुटुंबात झाला. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. एक दिवस आपण औषध कंपनी स्थापन करु असा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. बीआर शेट्टी हे वयाच्या 31 व्या वर्षी चांगल्या संधींच्या शोधात होते. त्यावेळी फक्त 8 डॉलर्स म्हणजेच सुमारे 665 रुपये घेऊन ते दुबईला पोहोचले. तिथे सुरुवातीला त्यांनी सेल्समन म्हणून काम केले. घरोघरी जाऊन औषधे विकली. येथूनच त्यांनी चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.खूप संघर्ष केला आणि काही वर्षांतच त्यांनी स्वतःचे रुग्णालय स्थापन केले. त्यांच्या डॉक्टर पत्नीने याचे व्यवस्थापन केले. 1975 मध्ये बीआर शेट्टी यांनी दुबईमध्ये न्यू मेडिकल सेंटर (एनएमसी) हेल्थची स्थापना केली. जी युएईमधील पहिली खासगी आरोग्य सेवा पुरवणारी कंपनी होती. काही वर्षांतच ही कंपनी दुबईतील मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या कुटुंबियांना पैसे पाठवण्यात अडचणी येत असल्याचे बीआर शेट्टी यांच्या निदर्शनास आले. हे लक्षात घेऊन त्यांनी युएई एक्सचेंज ही वित्तीय सेवा देणारी कंपनी सुरू केली. काही वर्षांतच ही कंपनी चलन विनिमय आणि वित्तीय सेवा क्षेत्रात एक मोठे नाव बनली. 2016 मध्ये यूएई एक्सचेंजने 31 देशांमध्ये 800 कार्यालये उघडली. त्यानंतर 2003 मध्ये बी.आर. शेट्टी यांनी एनएमसी निओफार्मा ही औषध कंपनी सुरू केली.
नवनव्या कंपन्या सुरु होत गेल्या आणि शेट्टींचा बँक बॅलन्स वाढतच राहिला. एका क्षणी त्यांची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 हजार कोटींपर्यंत पोहोचली. आरोग्य, वित्त आणि रिअल इस्टेटमध्ये बीआर शेट्टींचे साम्राज्य पसरले होते. ते जगातील सर्वात श्रीमंत कन्नडगांपैकी एक बनले. शेट्टी एक विलासी जीवन जगत होते. त्यांच्याकडे अनेक रोल्स रॉयस कार आणि खासगी जेट होते. त्यांची संपत्ती आता दुनियेच्या नजरेत येऊ लागली होती. त्यांनी दशलक्षमध्ये बुर्ज खलिफात दोन मजले $25 खरेदी केले आणि दुबईमध्ये त्यांचे अनेक व्हिला होते.
बीआर शेट्टींच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चालले होते पण इतक्यातच माशी शिंकली. 2019 नंतर परिस्थिती इतकी बदलली की त्यांना त्यांची 12 हजार 400 कोटी रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकावी लागली. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया. 2019 मध्ये यूकेस्थित फर्म मडी वॉटर्सने एक ट्विट करपव बीआर शेट्टी यांच्या कंपन्यांवर गंभीर आरोप केले होते. 'बीआर शेट्टींची कंपनी मडी वॉर्ट्स कार्सन ब्लॉक नावाच्या एका शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या शॉर्ट सेलर कंपनीने एक रिपोर्ट ट्विट केला. ज्यामध्ये बीआर शेट्टी यांच्या कंपनीवर 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. जे त्यांनी लोकांपासून आणि त्यांच्या गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवलंय', असं म्हटलं. हिंडेनबर्गने अदानी समूहासोबत जे केले तसाच हा प्रकार होता.
शेट्टी यांनी कर्ज लपवले आणि कॅशचे आकडे वाढवल्याचा आरोप मडी वॉटर्सने केला. या धक्कादायक खुलाशानंतर शेट्टीच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. परिस्थिती इतकी वाईट बनली की बीआर शेट्टी यांना त्यांची 12 हजार 478 कोटी रुपयांची कंपनी इस्रायल-यूएई कन्सोर्टियमला फक्त 74 रुपयांना विकावी लागली. यानंतर यूएईच्या सेंट्रल बँकेने त्यांची बँक खाती निलंबित केली. शेट्टींच्या उद्योगांना काळ्या यादीत टाकण्यात आले.