Onion Price: इथं कांद्याला सोन्याचा भाव; एका किलोसाठी मोजावे लागतात 1200 रुपये
Onion Rate Rs 1200 Per Kg: महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते लासलगाव बाजार समितीपर्यंत सर्वच ठिकाणी कांद्याला न मिळणारे दर चर्चेत असून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Onion Rate Rs 1200 Per Kg: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. राज्यामध्या कांद्याला दर मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन सभागृहात निर्माण झालेल्या गदारोळानंतर हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमध्येही कांद्याच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. एकीकडे कांद्याचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकारणापासून कृषी क्षेत्रापर्यंत चर्चेच्या केंद्र स्थानी असतानाच दुसरीकडे एका देशात कांद्यचा भाव चक्क 1200 रुपये किलोपर्यंत गेला आहे. वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.
शेतमाल पूर्ण पिकण्याआधीच बाजारात
फिलिपिन्स सध्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. त्यामुळे येथील महागाईने नवीन उंची गाठली असून देशामध्ये दैनंदिन वापराच्या गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्येही कांद्याने विक्रमी दरांपर्यंत उसळी मारली आहे. कांदा उत्पादक सध्या या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या हिशेबाने शेतमाल पूर्ण तयार होण्याआधीच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. लुईस एन्जल्स नावाच्या एका शेतकऱ्यानेही अशाच प्रकारे कांद्याचं पूर्ण फळ धरण्याआधीच तो बाजारात विक्रीसाठी आणला आहे. फिलिपिन्समध्ये सध्या वाढत्या महागाईमुळे कांदा हा लक्झरी गोष्ट झाला आहे. मागील काही महिन्यांमध्ये देशातील कांद्याचा दर चांगलाच वाढला आहे. स्थानिक चलनानुसार एक किलो कांद्यासाठी 600 ते 800 पिसोस म्हणजेच भारतीय चलनामध्ये 900 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. देशाची राजधानी असलेल्या मनिलामधील एका मॉलमधले हे दर आहेत.
हॉटेल्सने कांदा केला हद्दपार
अनेक हॉटेलने आपल्या खाद्यपदार्थांमधून कांदा हद्दपार केला आहे. देशातील महागाईच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास सध्या असलेला महागाईचा दर हा मागील 14 वर्षातील फिलिपिन्समधील सर्वाधिक दर आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता कांद्याचे दर 200 पिसोस म्हणजेच 300 रुपये किलोपर्यंत आणण्यासाठी या देशातील केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. फिलिपिन्स सरकारने कांद्याची आयात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 21 हजार टन कांदा आयात करण्यास परवानगी देतानाच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासही सुरुवात झाली आहे.
सरकारचे प्रयत्न सुरु पण...
सरकारच्या प्राथमिक प्रयत्नांनंतरही कांद्याचे दर चढेच आहेत. शेतकरीही यामधून नफा मिळवण्यासाठी कांद्याचं फळ पूर्णपणे विकसित होण्याआधीच आहे त्या स्थितीत कांदा काढून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 37 वर्षीय लुईस एन्जल्स नावाचा शेतकरी, "हे ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच कांद्याचे दर एवढ्या वर गेले आहेत," असं सांगतो. देशाची 'ओनियन कॅपिटल' असलेल्या बोंगाबोनमध्ये कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या लुईस एन्जल्सने जेवढे पिकलेत तेवढे कांदे सध्या विक्रीसाठी बाजारात आणले आहेत. त्याच्या कांद्यांना 380 रुपये किलोचा दर मिळाला.