Science News: अवकाश... कमालीचं कुतूहल वाटणारं एक विश्व. अवकाशाशी संबंधित अनेक संज्ञा मागील काळामध्ये विविध संकल्पनांना आणि संशोधनांना वाव देताना दिसल्या. नवनवीन ग्रहतारे असो किंवा अवकाशातील एखादी खगोलीय घटना असो, नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं कायमच या कैक मैल दूर असणाऱ्या जगताचं प्रत्यक्षरुप सामान्यांपुढे अगदी सोप्या पद्धतीनं सादर केलं. याच अंतराळ संस्थेच्या जेम्स वेब नावाच्या दुर्बिणीनं एक जबरदस्त संशोधन केलं आहे, जिथं चक्क हिरेजडित ग्रह जगासमोर आला आहे.
पृथ्वीहून पाचपट मोठा असणारा हा ग्रह संपूर्णरित्या हिऱ्यांनी भरलेला असू शकतो असा निष्कर्ष या शोधातून लावला जात आहे. शास्त्रज्ञांनी या ग्रहाला 55 कॅन्क्री ई (55 Cancri e) असं नाव दिलं असून तो पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्ष दूर असल्याचं सांगण्यात येत आहे. या संशोधनामुळं खगोलीय क्षेत्रात काही नव्या संकल्पना आणि संभावनांना वाव मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.
55 कॅन्क्री ई या ग्रहाला सध्या 'सुपर अर्थ' या श्रेणीत ठेवण्यात आलं असून त्याचा आकार पृथ्वीहून पाचपट असल्याचं सांगण्यात येतं. या ग्रहाचा एक मोठा भाग हिरे आणि ग्रफाईट यांसारख्या कार्बन संरचनांपासून तयार झाला असून, या संशोधनामुळं पारंपरिक ग्रह रचना आणि ब्रह्मांडातील विविधतेसंदर्भात अनेक गोष्टी लक्षात येत आहेत.
नव्यानं शोध लागलेल्या या ग्रहाचं तापमान प्रचंड असून, तो आपल्या ताऱ्यापासून अतिशय जवळ असल्यानं 17 तासांमध्ये आपल्या एका कक्षेतील परिक्रमा पूर्ण करतो. ज्यामुळं या ग्रहाचं तापमान 2400 अंश सेल्सिअस इतकं सांगण्यात येतं. इतक्या भीषण उष्णतेमध्ये जीवसृष्टीची शक्यता धुसर किंबहुना नसल्याचच स्पष्ट होतं असं संशोधकांचं निरीक्षण. या ग्रहावर असणारं वातावरण पूर्णपणे वेगळं असून शास्त्रज्ञांनी त्याच्या चारही बाजूंनी एका विशिष्ट वातावरणाची अर्थात secondary atmosphere च्या अस्तित्वाची शक्यताही वर्तवली आहे. या स्थितीमुळं ज्वालामुखीय क्रियेला वाव मिळतो असंही सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका अहवालानुसार आता शास्त्रज्ञ या ग्रहाच्या खोलीचा अभ्यास करत त्या मआध्यमातून ब्रह्मांडात आणखी असे नेमके किती ग्रह अस्तित्वात आहेत याचा शोध घेत आहेत.