काबुलमधील रेस्तराँमध्ये IED स्फोट, चिनी नागरिकांना करण्यात आलं टार्गेट; जवळपास 7 जण ठार, 13 जखमी

IED Blast in Kabul: काबूलच्या शाहर-ए-नाव परिसरात झालेल्या आयईडी स्फोटात किमान सात जण ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2026, 09:42 PM IST
काबुलमधील रेस्तराँमध्ये IED स्फोट, चिनी नागरिकांना करण्यात आलं टार्गेट; जवळपास 7 जण ठार, 13 जखमी

IED Blast in Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात किमान सात लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचे लक्ष्य शहर-ए-नवा भागातील एक हॉटेल होते, असं सांगण्यात येत आहे. या व्यावसायिक भागात मोठ्या कार्यालयीन इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि दूतावास आहेत. शहर-ए-नवा हा काबुलमधील सर्वात सुरक्षित भागांपैकी एक मानला जातो.

Add Zee News as a Preferred Source

अफगाणिस्तानच्या राजधानीत रुग्णालय चालवणाऱ्या 'इमर्जन्सी' या इटालियन स्वयंसेवी संस्थेने सांगितलं आहे की, "आज दुपारी शहर-ए-नवा परिसरात, रुग्णालयाजवळ झालेल्या स्फोटानंतर आमच्या काबुल येथील सर्जिकल सेंटरमध्ये 20 जणांना आणण्यात आले. त्यापैकी सात जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता." या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, चिनी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये किमान सात जण ठार झाले. तालिबानमधील प्रतिस्पर्धी गटांवर या हल्ल्यामागे असल्याचा आरोप आहे.

रॉयटर्सने अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, या स्फोटात अनेक लोक ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य काबुलच्या कडक तटबंदी असलेल्या भागात असलेल्या हॉटेलजवळ हा स्फोट झाला.

तालिबान सरकारने जारी केलं निवेदन

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने स्फोटाबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काबुलच्या शहर-ए-नवा भागात झालेल्या स्फोटात अनेक लोक ठार झाले आहेत आणि काही जण जखमी झाले आहेत.

काबूलच्या सर्वात सुरक्षित भागात हल्ला

हे लक्षात घेण्यासारखे आहे की शहर-ए-नव परिसर हा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सर्वात सुरक्षित परिसर मानला जातो आणि येथे अनेक परदेशी नागरिक राहतात. या भागातील हल्ला तालिबान सरकारसाठी एक मोठे आव्हान आहे.

काबूलमध्ये यापूर्वी आत्मघाती बॉम्बस्फोट 

2025 मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोट झाले आहेत. पहिला आत्मघाती बॉम्बस्फोट फेब्रुवारी 2025 मध्ये झाला होता, जेव्हा एका हल्लेखोराने शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण जखमी झाले होते. दुसरा आत्मघाती हल्ला त्याच आठवड्यात ईशान्य अफगाणिस्तानातील एका बँकेबाहेर झाला होता, ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More