)
38 वर्षीय मॉडेलसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला त्यानेच तिचा घात केलाय. एवढंच नव्हे तर तिच्या ज्या पद्धतीने करुण अंत झाला त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. अहवालांनुसार, फेब्रुवारीमध्ये क्रिस्टीना जोकिस्मोविच तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृतदेह विद्रूप अवस्थेत आढळला होता. त्यानंतरच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी आता न्यायालयाला धक्कादायक माहिती दिली आहे.
स्विस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टीनाचा पती थॉमसने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. सुरुवातीला त्याने दावा केला होता की त्याला त्याची पत्नी घरी मृतावस्थेत आढळली आणि ते दृश्य पाहून तो घाबरला होता, त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. नंतर, पोलिस तपासातून सत्य समोर आल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला. नंतर थॉमसने वेगळा दावा केला की, क्रिस्टीनाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर त्याने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.
न्यायालयीन कामकाजादरम्यान स्थानिक माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, थॉमसने प्रथम क्रिस्टीनाचा गळा दाबला. नंतर त्याने करवत, बागेतील कात्री आणि चाकूने मृतदेहाचे तुकडे केले. शिवाय, त्याने शरीराचे अवयव ब्लेंडरमध्ये बारीक करून प्युरी बनवली. त्यानंतर त्याने शरीराचे सर्व अवयव रासायनिक द्रावणात बुडवले आणि शरीराचे सर्व अवशेष पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, तपासात स्पष्ट पुरावे आढळले आहेत की, थॉमस मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. या प्रकरणात कोणताही निकाल देण्यात आलेला नाही. वृत्तानुसार, क्रिस्टीना आणि थॉमस यांना दोन मुले आहेत. कुटुंब नेहमीच आनंदी दिसत होते. क्रिस्टीनाच्या हृदयद्रावक मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. क्रिस्टीनाने 2007 मध्ये मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंडचा किताब जिंकला, त्यानंतर ती मिस स्वित्झर्लंड स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली. त्यानंतर, तिने मॉडेलिंग प्रशिक्षक म्हणून काम केले.