)
Shubhanshu Shukla Returns From Space: AXIOM-4 मोहिमेअंतर्गत अंतराळात गेलेले कॅप्टन शुभांशू शुल्का पृथ्वीवर परतले आहेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्रात चार अंतराळवीरांचं आगमन झाले आहे. शुभांशू शुक्ला पृथ्वीवर आल्यानंतर भारतात जल्लोष साजरा करण्यात आला. शुभाशू शुक्लांचं कुटुंबीय भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच भारतीयांनाही जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, शुभांशू शुक्ला अंतराळातून काय घेऊन आले याबाबत नासाने मोठा खुलासा केला आहे.
मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:07 वाजता, यानाने डी-ऑर्बिट बर्नची प्रक्रिया सुरू केली, जी कोणत्याही परतीच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेद्वारे, यानाचा वेग कमी केला जातो जेणेकरून ते पृथ्वीच्या वातावरणात सुरक्षितपणे प्रवेश करू शकते. यानंतर, पहाटे 3:01 वाजता, यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळील समुद्रात यानाचे स्प्लॅश डाऊन झाले. यानंचर एका जहाजावर अंतराळवीरांना कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले. पृथ्वीवर परतल्यानंतर, अंतराळवीरांसाठी 7 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे.
अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळांच्या शरीराला गुरुत्वाकर्षण जाणवत नसल्याने, परतल्यावर, अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. या काळात, वैद्यकीय तपासणी, व्यायाम आणि मानसिक समुपदेशन यासारख्या प्रक्रिया केल्या जातात. सुरुवातीला हे खाजगी अभियान अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले होते. परंतु अखेर 25 जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ते यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. हे अभियान भारतासाठी खास होते कारण शुभांशू शुक्लाच्या सहभागामुळे अवकाश संशोधनाच्या जागतिक व्यासपीठावर भारताला एक नवीन ओळख मिळाली आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळवीर सुमारे 580 पौंड म्हणजेच सुमारे 263 किलोग्रॅम आवश्यक वस्तू आणि डेटा घेऊन पृथ्वीवर परतत आहेत. यामध्ये नासाचे वैज्ञानिक हार्डवेअर आणि मोहिमेदरम्यान यशस्वीरित्या पार पडलेल्या 60 हून अधिक प्रयोगांचा डेटा समाविष्ट आहे. या प्रयोगांमधून पृथ्वीवरील संशोधनासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे.