₹415 कोटींना पडली 'ती' एक चूक; डिलेव्हरी बॉयला Starbucks का देणार इतकी रक्कम?

Starbucks To Pay ₹415 Crore: या प्रकरणामध्ये मागील पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी निकाल लागला असून तो कंपनीविरोधात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 17, 2025, 12:01 PM IST
₹415 कोटींना पडली 'ती' एक चूक; डिलेव्हरी बॉयला Starbucks का देणार इतकी रक्कम?
कोर्टाने दिले आदेश (प्रातिनिधिक फोटो) (सौजन्य - रॉयटर्स आणि एनव्हायटी न्यूज सर्विसकडून साभार)

Starbucks To Pay ₹415 Crore: अमेरिकेमधील कॅलिफॉर्नियामध्ये कोर्टाने जगप्रसिद्ध कॉफी विक्रेता कंपनी असलेल्या 'स्टारबक्स'विरोधात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 'स्टारबक्स'ने एका ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून 50 मिलियन अमेरिकी डॉलर्स द्यावेत असं कोर्टाने निकालात म्हटलं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 415 कोटी रुपये इतकी होती. हा ग्राहक 'स्टारबक्स'ची कॉफी ड्राइव्ह थ्रूच्या रांगेतून घेऊन जात असतानाच कॉफी अंगावर पडून त्याला भाजलं. याच प्रकरणामध्ये कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार हा सारा प्रकार लॉस एंजलिसमधील ड्राइव्ह थ्रूच्या रांगेत घडला. मायकल गार्सिया नावाचा डिलेव्हरी ड्रायवर (कारने फूड डिलेव्हर करणारा डिलेव्हरी बॉय) कॉफी पिकअप करत असतानाच ही घटना घडली.

नेमकं घडलं काय?

कॅलिफॉर्नियामधील उच्च न्यायालयामध्ये 2020 साली दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये या चालकाच्या "मांडीवर गरम कॉफी सांडली. त्यामुळे या चालकाची त्वचा भाजली तसेच गुप्तांगालाही इजा झाली," असं म्हटलं आहे. 'स्टारबक्स'ने कॉफी देताना खबरदारी घेतली नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कॉफीच्या ग्लासचं झाकणं योग्य पद्धतीने न लावल्याने हा अपघात घडला आणि सदर व्यक्तीला इजा झाल्याचा दावा करण्यात आला. गार्सियाला झालेल्या जखमा या जीवाला धोका ठरणाऱ्या आणि त्याच्या दैनंदिन शारीरिक हलचालींवर मर्यादा आणणाऱ्या आणि त्यावर कायम स्वरुपी परिणाम करणाऱ्या असल्याचं नमूद करण्यात आलेलं. 

या व्यक्तीने काय दावा केला?

गार्सियाची बाजू मांडणारे त्याचे वकील मिचेल पार्कर यांनी, तीन कॉफी घेताना हा अपघात झाला. या तीनपैकी एका कॉफीच्या ग्लासवरील झाकण योग्यपद्धतीने लावण्यात आलं नव्हतं. कॉफी हातात घेतानाच ती गार्सियाच्या मांडीवर सांडली, असा दावा करण्यात आला. कोर्टाने गार्सियाचं सर्व म्हणणं योग्य असल्याचं म्हटलं. त्याला या साऱ्यामुळे शारीरिक इजा झाली, मानसिक त्रास सहन करावा लागला. आयु्ष्यातील अनेक आनंदाच्या क्षणांना मुकावं लागलं, अपमान सहन करावा लागला, भावनिक त्रास सहन करावा लागला, असं कोर्टाने निरिक्षण नोंदवताना म्हटलं आहे. तसेच 'स्टारबक्स'ला 415 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिलेत.

'स्टारबक्स'ला निकाल अमान्य

मात्र 'स्टारबक्स'ने या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. "आम्हाला गार्सियाबद्दल सहानुभूती आहे. मात्र या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. या अपघातासाठी आम्ही जबाबदार असल्याचं आम्हाला मान्य नाही. तसेच मान्य करण्यात आलेली नुकसानभरपाई ही गरजेपेक्षा अधिक असल्याचं आमचं मत आहे," असं 'स्टारबक्स'च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. "आम्ही आमच्या दुकानांमध्ये सुरक्षेसंदर्भात सर्व खबरदारी घेतो. यामध्ये गरम पेय हाताळतानाही विशेष काळजी घेतली जाते," असंही 'स्टारबक्स'चे प्रवक्ते म्हणाले.