Syria Civil War Explainer : सीरियात बशर अल असद (Bashar al-Assad) यांच्या कुटुंबियांची 50 वर्षांची सत्ता अखेर उलथवण्यात आली. परिणामी असद यांना रशियात शरण घ्यावी लागली. हा रशियासाठी देखील सर्वात मोठा दणका आहे. अशात जे कोणत्याच बंडखोरांना जमलं नाही ते HTS ला कसं शक्य झालं, ते कोण आणि पुढे काय? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्या सर्वांची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत.


12 दिवसांत तख्तपालट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरियात ज्या बंडखोर संघटनेने सत्ता उलथवली त्यांचं HTS अर्थात हयात तहरीर अल शाम असं नाव आहे. अगदी 12 दिवसांपूर्वी या संघटनेच्या बंडखोरांनी सरकारविरोधात सशस्त्र उठाव केला आणि अवघ्या दोन दिवसांत सीरियातील तिसरं सर्वात मोठं शहर होम्स ताब्यात घेतलं.


सुरुवातीला सरकारलादेखील या संघटनेचं गांभीर्य नसावं. अचानक हल्ले तीव्र करून 11 दिवसांमध्ये एचटीएसने चक्क सीरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेतली. यानंतर बशर अल असद यांना सहकुटुंब आपल्या महलातून फरार व्हावं लागलं.


असद कुठे आहेत?


बशर अल असद यांनी आपल्यावर हल्ला होणार याची खबरदारी घेत रशियाशी संपर्क साधला आणि ते रशियाला रवाना झाले. यानंतर रशियाने सुद्धा त्यांना शरण दिल्याचे औपचारिकरित्या जाहीर केले.


यानंतर देशात एकच गोंधळ उडाला. बंडखोर रस्त्यांवर उतरले. राजधानी आणि इतर शहरांच्या तुरुंगांमध्ये कैद असलेल्या सरकारविरोधी बंडखोरांची सुटका केली. या सर्व घडामोडींची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.


रशियाची भूमिका काय?


रशिया गेल्या अनेक वर्षांपासून सीरियाचा घनिष्ठ मित्र राहिला. त्या बदल्यात सीरियाने आपल्या देशात रशियाचे बेस तयार केले. अनेक ठिकाणी 49 वर्षांच्या करार तत्वावर रशियाला लष्करासाठी जमिनी देण्यात आल्या.


सीरियात यापूर्वीही अनेक बंडखोर संघटनांनी असद यांची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी रशिया सीरियाच्या पाठीशी होता. दहशतवादी संघटना आयसिसचे सरकारविरोधी हल्ले झाले त्यावेळी रशियाने हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून आयसिसला पळवून लावले होते. त्यामुळे, सीरियावर संकट आल्यानंतर असद यांच्या सुरक्षेसाठी सर्वात प्रथम रशियाने हात पुढे केला.


रशियाने आता सीरियाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपातकालीन बैठक बोलावली आहे. यात रशियाची पुढची भूमिका ठरवली जाणार आहे.


सीरियाचे मित्र कोण?


रशिया बशर अल असद आणि सीरियाचा सर्वात मोठा समर्थक देश आहे. या व्यतिरिक्त इराण सीरियाच्या पाठीशी आहे. सत्तापालट झाल्यानंतरही सीरियासोबत आपले मैत्रीचे संबंध राहतील अशी अपेक्षा इराणने व्यक्त केली. तरीही बंडखोर आपल्या देशांसोबत जसे वागतील तशीच वागणूक त्यांना मिळेल अशी भूमिका इराणने घेतली आहे.


अमेरिकेने काय म्हटलंय?


अमेरिका सीरियाच्या नागरिकांसाठी ही मोठी संधी असली तरीही या देशाच्या भविष्यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली. सोबतच, या बंडखोर संघटनेच्या यशानंतर सीरियात इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटना फोफावतील असेही अमेरिकेला वाटते. अमेरिकेसह तुर्कीने सुद्धा सीरियात स्थैर्यासाठी प्रय़त्न केले जावेत अशी भावना व्यक्त केली आहे.


फक्त 12 दिवसांत सत्तापालट कसं जमलं? HTS कोण?


आता सर्वात महत्वाचा प्रश्न उद्भवतो की जे भल्या-भल्या बंडखोर आणि दहशतवादी संघटना आयसिसला जमलं नाही ते HTS ने इतक्या लवकर कसं करून दाखवलं? याचा नेता कोण?


अर्थातच हे काम 12 दिवसांचं नाही. तर याची तयारी दशकांपासून सुरू होती. ‘हयात तहरीर अल शाम’ या बंडखोर संघटनेच्या नेत्याचं नाव मोहम्मद अल-जॉलानी असं आहे. सीरियात अनेक बंडखोर संघटना सरकारविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होत्या. त्यापैकीच एक संघटना होती ‘जभात अल नुस्र’ हेच या संघटनेचं जुनं नाव आहे.


जभात अल नुस्र या संघटनेचा थेट ‘ऐमन अल जवाहिरी’च्या ‘अलकायदा’शी संबंध आहे. अलकायदापासून काही दहशतवादी वेगळे पडले आणि त्यांनी 2011 मध्ये आयसिसची स्थापना केली. त्याचवेळी जभात अल नुस्रची स्थापना झाली होती. याच्या स्थापनेत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादीचा देखील हात होता.


सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात सर्वात मोठा बंडखोर गट म्हणून जभात अल नुस्र कुप्रसिद्ध होता. तसेच अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी याला दहशतवादी संघटना घोषित केले होते.


काही वर्षांपूर्वी या संघटनेचा म्होरक्या मोहम्मद अल-जॉलानीने आपले अलकायदा आणि आयसिसशी संबंध तोडले आणि आपल्या बंडखोर संघटनेला ‘हयात तहरीर अल शाम’ असं नाव दिलं. आता हाच म्होरक्या जॉलानी सीरियात बशर अल असदची जागा घेऊ पाहत आहे.


पुढे काय?


या घटनेनंतर सीरिया सरकारचा विरोध करत आलेल्या सर्वच संघटना उत्साही आहेत आणि सर्वांना सीरियातील संभाव्य सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. फ्री सीरियन आर्मी, सीरियन रेव्होल्युशनरी आणि विरोधी संघटना या सर्वांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दीमा मूसा यांनी सर्व बंडखोरांना एकाच टेबलावर बसून सत्ता स्थापनेवर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. बंडखोर आघाडीच्या नेत्या असून तुर्कीने त्यांना आश्रय दिलेला आहे.


भारतावर काय परिणाम होईल?


या अराजकतेचा भारतावर तातडीने काही परिणाम होणार नसला तरीही गुंतवणूकदारांच्या चिंता वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. भारतीय शेअर मार्केटमध्ये याचा तात्पुरता नकारात्मक प्रभाव दिसू शकतो.